- मावळात बंदुकीच्या धाकाने बारबालांवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रु.) :- त्या… अचानक घडलेल्या प्रसंगामुळे बिथरलेल्या त्यांनी…. वाट फुटेल तिकडे पळ काढला. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी मावळातील फळणे गावातील दोन तरुणांकडे त्यांनी मदतीची याचना केली. मात्र, त्या रंगेल नेत्याने आणि त्याच्या साथीदाराने चारचाकीने त्यांचा पाठलाग करीत, त्या दोघा तरुणांनाही पिस्तूलाचा धाक दाखवला. शेवटी त्या चौघींनी गावातील मंदिराचा आसरा घेतला. गावकऱ्यांना या प्रकरणाची चाहूल लागल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर त्यांची सुटका झाली.
एखाद्या फिल्मी स्टाईल घटनेप्रमाणे वडगाव मावळ परिसरात शुक्रवार (दि. ८) रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला. पनवेलच्या बारमध्ये बारबाला म्हणून काम करणाऱ्या चार बारबालांना शहराजवळील एका रंगेल नेत्याने एका मित्राच्या मदतीने मावळातील फार्म हाऊसवर पार्टीसाठी बोलावले होते. पार्टी संपल्यानंतर त्यातील एकीवर पिस्तूल रोखत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात पिडीत बारबालांपैकी एकीने के. के. ऊर्फ अमित आणि त्याच्याबरोबर असलेल्या एका रंगेला विरोधात फिर्याद दाखल केली आहे. के. के. हा त्याच्या साथीदाराला सरपंच या नावाने साद घालीत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी ज्यावेळी या आरोपीची झडती घेतली, त्यावेळी या आरोपीकडे एका प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्याचे व्हिजिटिंग कार्ड आढळून आले आहे. त्यामुळे या घटनेत सामील आरोपींची काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? तसेच हा सरपंच रंगेल नेता कोण? त्याला नेमकं कोण पाठीशी घालतय, याचा तपास देखील पोलीस घेत आहेत.











