न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रु.) :- भंडारा-गोंदिया क्षेत्रात विकास खुंटलेला आहे. विकास हा नागपूरमध्ये झाला आहे. तो विकास भंडारा – गोंदिया जिल्ह्यात केव्हा होईल? तसेच अदानी, व्हिडिओकॉनसारखे कारखाने असूनही, त्याचा फायदा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना झालेला नाही. भाजपा पदाधिकारी व समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले तसेच खासदार प्रफुल पटेल यांच्याकडुनही याबाबत प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.
त्यामुळे महाराष्ट्र सरकार या जिल्ह्याला न्याय देण्यास असमर्थ ठरले असून, भंडारा – गोंदिया जिल्ह्याचे मध्यप्रदेश राज्यात विभाजन करावे, अशी मागणी शिवसेना तिरोडा-गोरेगाव विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, भारत देश स्वतंत्र झाल्यापासुन ते आजपर्यंत राज्य सरकारकडून भंडारा-गोंदीया जिल्ह्यासाठी विकासात्मक पाउल उचलले जात नाही व तशा प्रकारचे नियोजनही केले जात नसल्याचे, पाहवयास मिळत आहे. सुशिक्षित तरूण-तरूणी बेरोजगाराने अतिशय त्रस्त झाले आहे. त्यामुळे त्यांचे पाउल नक्षलवादाकडे वळले जाण्याचा धोका आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे मध्यप्रदेश या विकसित राज्यात विभाजन करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून, येथील सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा, असे या पत्रात युवराज दाखले यांनी म्हटले आहे.











