न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२२) :- शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या उपायुक्तांना दोन महिन्यानंतर काम मिळाले आहे. उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, विठ्ठल जोशी यांना जबाबदारी मिळाली आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी आदेश काढले आहेत. नगरविकास विभागाने तीन सहायक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत ३१ मार्च २०२२ रोजी उपजिल्हाधिकारी ढोले विठ्ठल जोशी यांची प्रतिनियुक्तीने बदली केली. ४ एप्रिल रोजी ढोले, जोशी महापालिकेत रुजू झाले. त्यानंतर रुजू होऊन एक महिना झाला तरी उपायुक्तांना कामकाज दिले नव्हते. अखेरीस महिनाभरानंतर आयुक्तांनी उपायुक्त ढोले यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन विषयक कामकाज आणि पशुवैद्यकीय विभाग तर उपायुक्त जोशी यांच्याकडे दक्षता व गुण नियंत्रण, माहिती व तंत्रज्ञान विभाग, नागरी सुविधा केंद्राचा कार्यभार दिला आहे. तर उपायुक्त संदीप खोत यांच्याकडील आरोग्य विभाग काढून घेतला आहे.
तीन सहायक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे. यामध्ये सहायक आयुक्त रविकिरण घोडके यांच्याकडील ‘ ग ‘ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार काढून माहिती व जनसंपर्क, स्वच्छ सर्वेक्षण कामकाज समन्वयक हा पदभार दिला आहे. विनोद जळक यांच्याकडून स्वच्छ सर्वेक्षण कामकाज समन्वयक काढून ‘ ग ‘ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार दिला आहे. सहायक आयुक्त वामन नेमाणे यांच्याकडील जनसंपर्क विभाग काढून त्यांच्याकडे आता प्रशासन विभागाचे कामकाज कायम ठेवले आहे.