- योजनेच्या सुधारित प्रस्तावास प्रशासकाची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२२) :- एच.आय.व्ही. बाधित मुलांचा सांभाळ करणा-या संस्थेला अथवा पालकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून देण्यात येणा-या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. या योजनेच्या सुधारित प्रस्तावास प्रशासक राजेश पाटील यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.
महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विविध घटकांसाठी योजना राबवल्या जातात. यातील काही योजनांमध्ये कालानुरूप बदल करण्यात आला आहे. एच.आय.व्ही. बाधितांचा सांभाळ करणा-या पालकांना अथवा संस्थांना महापालिका अर्थसहाय्य करीत आली आहे. यासाठी विहित अटी- शर्ती निश्चित करण्यात आल्या होत्या. यातील काही अटी- शर्ती आणि लाभाच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात आला आहे.
एच.आय.व्ही. बाधित रुग्णांचे मानसिक आणि शारिरीक आरोग्य बळकट होण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या रुग्णांचे शारिरीक आरोग्य सुधारण्यासाठी त्यांना संतुलित आणि पोषक आहाराची आवश्यकता असते. या आहारासाठी महापालिका दरमहा अर्थसहाय्य करते.
महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा मनपा हद्दीतील ० ते १८ वर्षे वयोगटातील एच.आय.व्ही बाधित रुग्ण सांभाळणा-या संस्थेला अथवा पालकांना हे अर्थसहाय्य मिळत होते. आता या अटींमध्ये बदल करण्यात आला आहे. बाधित रुग्णांच्या वयोगटात वाढ करण्यात आली असून आता ० ते २१ वर्षे वयोगटातील एच.आय.व्ही. बाधित रुग्ण सांभाळणाऱ्या संस्थेला अथवा पालकांनाही आता अर्थसहाय्य मिळणार आहे. तसेच पूर्वी दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य मिळत होते, त्यात दरमहा पाचशे रुपयांची वाढ करून आता ३ हजार रुपये इतके अर्थसहाय्य केले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने अर्जासमवेत मनपा हद्दीतील स्वत:चे आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. यासोबत पालकांचे मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीची प्रत सोबत जोडणे गरजेचे आहे. संस्थेचे “सार्वजनिक विश्वस्त कायदा” अथवा “संस्था नोंदणी अधिनियम १९६०” नुसार नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असून पाल्य एच.आय.व्ही. बाधित असल्याचे शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा ART कार्ड ची प्रत सोबत असणे बंधनकारक आहे. तसेच पाल्याचा वयाचा पुरावा सोबत जोडणे अनिवार्य आहे. या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.