- एकसमान आकाराचे व डिझाईनचे होर्डिंग लावण्याचे पालिकेचे नियोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरात नवे बाह्य जाहिरात धोरण राबविण्यास सत्ताधारी भाजपने नकार दिला होता. मात्र, प्रशासकीय राजवटीत त्या धोरणास विधी समिती व सर्वसाधारण सभेत मंगळवारी (दि. १०) मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शहरात पुढील ६ ते ७ महिन्यात केवळ महापालिकेच्या मालकीचे एकसमान आकाराचे व सजावटीचे होर्डिंग दिसणार आहेत.
या संदर्भात आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले की, जगातील विविध देशाचा अभ्यास करून जाहिरात होर्डिंग धोरण निश्चित करण्यात आले. ते एकसमान होर्डिंग निविदा काढून एजन्सीला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. होर्डिंगसंदर्भातील नव्या संकल्पनेसाठी पालिकेने स्पर्धाही घेतली आहे. त्यातील योग्य संकल्पनेचा नव्या धोरणात अवलंब केला जाणार आहे.
खासगी जागेत पालिकेच्या अटी व शर्तीनुसार होर्डिंग उभारणे बंधनकारक असणार आहे. त्याचा आकार व डिझाईन पालिका निश्चित करणार आहे. नियमात असलेल्या होर्डिंगला पालिका परवानगी देणार आहे. या माध्यमातून पालिकेचे उत्पन्नात मोठी भर पडणार आहे, असा दावा आयुक्तांनी केला.
या नव्या धोरणानुसार शहरात कोठेही कोणालाही जाहिरात होर्डिंग लावता येणार आहे. या पुढे केवळ महापालिका स्वतः होर्डिंग उभारणार आहे. संपूर्ण शहरात अत्याधुनिक पद्धतीचे २० फूट बाय ४० फूट, २० फूट बाय २० फूट आणि २० फूट बाय १५ फूट अशा एकसमान आकार व डिझाईनचे सुमारे ५०० होर्डिंग लावण्याचे नियोजन आहे. त्या – त्या भागानुसार चालू, बाजारभावानुसार त्या होर्डिंगचा दर आहे. अंधारातही ते होर्डिंग स्पष्टपणे दिसणार आहेत, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.