न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२२) :- अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे आज दिवसभर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. केतकीनं तिच्या फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये शरद पवारांवर खालच्या स्तरावर टीका केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी टीका केली.
जितेंद्र आव्हाडांसह सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केतकीवर कारवाईची मागणी केली. तिच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला पोलिसांनी चौकशीसाठी नवी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता तिला अटक करण्यात आली आहे. यादरम्यान, तिला ठाणे क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात येत असताना तिच्यावर काळी शाई फेकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबई येथून केतकी चितळे हिला आधी ताब्यात घेतलं होतं. तिची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. यानंतर तिला कळंबोली पोलीस स्थानकातून ठाणे क्राईम ब्रांचच्या हवाली करताना स्थानकाच्या बाहेरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केतकी चितळेच्या अंगावर काळी शाई फेकून तिच्या सोशल पोस्टचा निषेध केला. यानंतर पोलीस तिला गाडीत घेऊन गेले. पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून केतकी कळंबोलीतील अव्हेलोन इमारतीत राहत होती.