- ओळखपत्र गरजेचे; पीएमपीएमएल प्रशासनाचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२२) :- पूर्णत: अंध व्यक्तीच्या मदतनिसाला पीएमपीएमएल बस प्रवासात ५० टक्के दरात प्रवास करता येणार आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने नुकताच याबाबतचा निर्णय घेतला आहे.
बरेचदा अंध व्यक्तीबरोबर प्रवास करताना मदतनीस असतो; परंतु त्यास तिकीट काढून प्रवास करावा लागतो. ही बाब विचारात घेऊन पूर्णतः अंध असलेल्या व्यक्तीच्या मदतनिसाला प्रवासात ५० टक्के दरात प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत सर्व आगार व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
पीएमपीएमएलच्या वतीने अंध, दिव्यांग व्यक्तींना मोफत पास देण्यात येत असतो. पीएमपीएमएलने दृष्टिहीन व्यक्तींना यंदा जवळपास ६१४ पास दिले आहेत. दृष्टिहीनसोबत प्रवास करण्यासाठी मदतनिसांना ओळखपत्र देण्यात आले आहे. हे ओळखपत्र वाहकांनी तपासून प्रवासाच्या ५० टक्के रक्कम घेऊन तिकीट द्यावे. ज्यावेळी दृष्टिहीन व्यक्ती सोबत असतील तेव्हाच मदतनिसांना प्रवास करता येईल आणि सवलतीचा लाभ घेता येईल, असे प्रस्तावात म्हटले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
पुणे शहर हद्दीतील व पीएमपी बस संचलन क्षेत्रापर्यंत (बस जिथपर्यंत जाईल) तेथील हद्दीपर्यंत रहाणाऱ्या दृष्टिहीन पासधारक व्यक्तीसोबत असलेल्या मदतनिसाला या सुविधेचा लाभ मिळणार आहे.