न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रु.) :- सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज सोमवार (दि. ११) रोजी सर्वपक्षीय विरोधक व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने पिंपरी चिंचवड मनपा इमारतीस मानवी साखळीद्वारे हातात गाजर घेऊन घेराव घालण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासुन सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरवासीयांना दिलेले गाजरांचे आश्वासन व पदाधिकाऱ्यांनी शहरातील शास्तीकर, प्राधिकरणातील घराचा प्रश्न, रिंगरोड, रेडझोन आदी प्रश्न तसेच विविध विकासकामांच्या निविदेत केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनसामान्यांचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय विरोधक व सामाजिक संस्थांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख योगेश बाबर, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, शेकापचे हरीष मोरे, स्वराज इंडिया अभियानाचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका वैशाली घोडेकर, अनुराधा गोफने, प्रज्ञा खानोलकर, संगीता ताम्हाणे, वर्षा जगताप, नगरसेवक श्याम लांडे, विक्रांत लांडे, माजी विरोधी पक्षनेते मच्छीन्द्र तात्या तापकीर, अरुण बोऱ्हाडे, फजल शेख, छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, युवराज दाखले आदी सहभागी झाले होते.
सर्व प्रथम सर्वविरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना गाजराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सर्व विरोधीपक्षांच्या वतीने महापालिकेच्या इमारतीस घेराव घालून सत्ताधाऱ्यांच्या पारदर्शक कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ”या सरकारचा करायच काय, खाली डोकं वर पाय”, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.
मात्र, या आंदोलनाला गालबोट लागले असून, सहभागी पक्षांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळेकर यांनी खासदार श्रीरंग बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्याबद्दल अपशब्द वापरले, त्यामुळे आंदोलनात सहभागी शिवसैनिक चांगलेच खवळून उठले. खासदारांचे नाव का घेतले, असा जाब शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर आणि संपर्क प्रमुख युवराज दाखले यांनी छावा संघटनेला विचारला व त्यावरून वादंग पेटले. तेवढ्यात राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, गटनेते राहूल कलाटे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पुढाकार घालून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वपक्षीय विरोधकांचे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केलेला एकजुटीने विरोध, हा तत्कालीन ठरतो की काय? अशी राजकीय वर्तुळात कुजबुज सुरु झाली आहे.












