न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रु.) :- क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलमलच्या कार्यक्रमास रस्ते वाहतूक व महामार्ग जल वाहतूक व जहाज बांधणी नदी विकास तसेच गंगा पुनरुत्थान विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली.
याप्रसंगी पक्षनेते एकनाथ पवार यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी आगामी मावळ लोकसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करणार नसल्याचे त्यांनी गडकरी यांना सांगितले. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या-ना त्या कारणाने भाजपवर सडकून टीका केली आहे. वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. सत्तेत असूनही सेनेने भाजपवर विरोधी व टोकाची भूमिका घेऊन पक्षाला अडचणीत आणले आहे.
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत युती झालीच, तर मावळची जागा भाजपला सोडा, अशी मागणी महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली आहे.
यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक विलास मडीगेरी, नामदेव ढाके, सुजाता पलांडे व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.











