न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२२) :- गाडी विक्रीच्या कारणावरून झालेला जुना वाद मिटविण्यासाठी सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथे मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला बोलविले. त्यावेळी त्यांच्यात बोलणे सुरू असताना आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली.
तसेच ‘आमच्यातील भांडणे मिटविणारा तू कोण’, असे म्हणत तुला बघुन घेतो, धमकी दिली. त्यावेळी आरोपीने जवळ पडलेली काचेची बाटली तरुणाच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले. हा प्रकार सोमवारी (दि. १६) दुपारी घडला.
शेखर बाबासाहेब गुंड (वय २९, रा. एम. के. चौक, नवी सांगवी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम थोपटे (वय २२) आणि सचिन शिंदे (वय २५, दोघेही रा. शिवशंभो कॉलनी, सदगुरूनगर, भोसरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
















