- तिकीट विक्रीही ऑनलाइन; या पोर्टलवर करावी लागणार नोंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२२) :- शहरात महापालिकेचे निगडी, पिंपळे गुरव, पिंपरी वाघेरे व कासारवाडी येथे ४ जलतरण तलाव आहेत. १३ पैकी ४ तलाव सुरू असल्याने या ठिकाणी पोहणाऱ्यांची गर्दी मोठी असते. त्यामुळे महापालिकेने तिकीट विक्री ऑनलाइन केली आहे. पासधारकांच्या सरावासाठी ऑनलाइन पद्धतीने शनिवार (दि. २१) ते गुरुवार (दि. २६) या काळात बुकिंग करता येणार आहे.
पासधारकांची पहिल्या बॅचची वेळ सकाळी ६.०० ते ७.०० ठरवण्यात आली आहे. ही वेळ वगळता उर्वरित ७ बॅचचे आरक्षण बुधवार (दि. १८) पासून सुरू करण्यात येत आहे. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळारील जतरण तलाव नोंदणी या लिंकवर क्लिक करुन बॅचचे आरक्षण करावे लागणार आहे.
पोहणाऱ्या नागरिकाने अथवा पाल्याने अथवा पालकांनी नोंद खाते तयार करणे ही प्रक्रिया एकदाच लागेल. नोंद केल्यानंतर लॉग इन करावे व आपला इच्छित जलतरण तलाव निवडून तारीख व वेळ निश्चित करून पोहणाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त तीन लोकांची नोंद आपण करू शकता. पोहणाऱ्या नागरिकांचा आधार क्रमांक या ठिकाणी नोंद करावा लागेल. पोहणाऱ्यांच्या संख्येनुसार प्रत्येकी दहा रुपये या दराने ऑनलाईन पेमेंट करणे. पेमेंट केल्यानंतर तो सीरियल नंबर लक्षा ठेवावा. निवडलेल्या तलावावर प्रवेशाच्या वेळेस हा नंबर संबंधित कर्मचा-यांना सांगून आपली नोंद प्रमाणित करावी. जलतरण तलाव सरावासाठी ऑनलाइन पद्धतीने बॅचचे आरक्षण केल्यानंतर तलावावर येताना आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणणे बंधनकारक आहे.
नागरिकांना जलतरण तलावावर पोहण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरु करण्यात आली आहे. नेहरूनगर, यमुनानगर, संभाजीनगर येथे पाणी भरण्याची कार्यवाही चालू आहे. या तलावात पाणी भरण्याची कार्यवाही पूर्ण होताच तेथील तिन्ही तलाव नागरिकांना पोहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. – सुषमा शिंदे सहाय्यक आयुक्त, महापालिका…
















