- शहर महिला कॉंग्रेसचे पालिका प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२२) :- मागील सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवड शहराला २४ तास पाणीपुरवठा करू असे जाहीर आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्याऐवजी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मागील अडीच वर्षांपासून दिवसाआड व अनियमित कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. याला लोकप्रतिनिधी आणि भाजपचे पदाधिकारी जबाबदार आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करू असे प्रशासनाने अनेकदा आश्वासन देऊन देखील अद्यापही पाणीपुरवठा पूर्णवेळ व सुरळीतपणे सुरू झालेला नाही याचा जाब विचारण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने गुरूवारी सकाळपासून मनपाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित महिला प्रशासनास जाब विचारीत होत्या की, पवना धरण १०० टक्के भरून देखील पाणीपुरवठा सुरळीत का केला जात नाही.
या आंदोलनात शहर काँग्रेस अध्यक्ष कैलास कदम, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे, माजी महापौर कवीचंद भाट, काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, माजी नगरसेविका निर्मला कदम, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, दिनकर भालेकर, विश्वनाथ जगताप, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, उमेश खंदारे, बाबा बनसोडे डॉ. मनीषा गरुड, स्वाती शिंदे, नंदा तुळसे, दीपाली भालेकर आदी उपस्थित होते.
या बेमुदत लाक्षणिक उपोषणास समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष रफिकभाई कुरेशी, भाट समाज तरुण मंडळाचे अध्यक्ष आनंद भाट, मातंग एकता आंदोलनाचे राधिका अडागळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
















