- पोलिसांकडून ८१ आरोपींवर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२२) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. १९) कोम्बिंग ऑपरेशन राबविले. गुन्हे शाखेचे युनिट एक ते पाच, खंडणी विरोधी पथक, दरोडा विरोधी पथक, शस्त्र विरोधी पथक यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटे पाचपर्यंत हे कोम्बिंग ऑपरेशन केले. यात गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तीन आरोपींना अटक केली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (३) सह १३५ प्रमाणे दोन गुन्हे दाखल केले. तसेच एक लोखंडी कोयता, मोबाईल व गुन्ह्यत वापरलेली दुचाकी असा ५६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
रेकाॅर्डवरील १३० आरोपी चेक केले. त्यातील ६० आरोपी मिळून आले. हिस्ट्रीशिटर ५२ आरोपी चेक केले. त्यातील १५ मिळून आले. गुंड, मवाली १८ चेक केले. त्यातील सहा मिळून आले. तसेच तडीपार आरोपी ९५, फरार आरोपी १२, पाहिजे आरोपी ८४, जबरी चोरी करणारे पाच आरोपी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान चेक केले. यात मिळून न आलेल्या गुन्हेगारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
गुन्हे शाखेप्रमाणेच पोलीस ठाण्यांकडूनही कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात रात्री उशिरापर्यंत विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांवर, रात्री उशिरापर्यंत हाॅटेल सुरू ठेवल्याप्रकरणी १० जणांवर तसेच गोंधळ घालत असलेल्या १५ आणि इतर सहा जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार पाच जणांवर कारवाई केली. तसेच दोन जणांना अटक करण्यात आली आणि पाच जणांना ‘वाॅरंट’ बजावण्यात आले. तसेच भादंवि कलम ३७९ अन्वये एका आरोपीला अटक केली.