- तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासन रडारवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२२) :- राज्याच्या अंदाज समितीने पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांची गुरूवारी (दि. १९) पुण्यात बैठक बोलावली होती. समितीचे प्रमुख आमदार रणजित कांबळे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीस आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता राजन पाटील तसेच, सर्व विभागप्रमुख, उपायुक्त उपस्थित होते. सर्वसाधारण सभेत नगरसवेकांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांवर समितीने प्रश्न उपस्थित केले.
नगरसेवकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कोरोना महामारीच्या कडक लॉकडाऊनमध्ये शेकडो मोकाट भटकी कुत्री पकडून त्यावर नसबंदी केली. त्यावर लाखो रूपये खर्च केले. ते काम पालिकेने कसे केले? त्यासंदर्भात उपायुक्त सचिन ढोले यांच्या खुलाशावर समितीने नाराजी व्यक्त केली. तसेच लॉकडाऊनमध्ये महिलांना गोळा करून त्यांना कसे प्रशिक्षण दिले?, असाही प्रश्न उपस्थित केला गेला.
स्पर्श रूग्णालयात एकही रूग्ण दाखल नसताना त्यांना इतक्या घाईने बिल का देण्यात आले? नगरसेवकांनी तक्रार केल्यानंतर त्यासाठी चौकशी समिती का नेमण्यात आली नाही? न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर प्रशासन का जागे झाले, असे मुद्दे समितीने उपस्थित केले. मोशी कचरा डेपोस वारंवार कशी आग लागते? यावर समितीने नाराजी व्यक्त केली. स्मार्ट सिटीत नगरसेवकांच्या अनेक तक्रारी होऊनही त्यावर कारवाई का केली नाही? निविदेची तांत्रिक तपासणी न करताच कोट्यवधीचे काम कशी दिली गेली? त्यावर समितीने ताशेरे ओढले.
स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक अशोक भालकर यांच्या खुलाशावर समितीचे समाधान झाले नाही. उपस्थित झालेल्या विविध मुद्यावर अहवाल सादर करण्याचे आदेश समितीप्रमुख रणजित कांबळे यांनी आयुक्त पाटील यांना दिले आहेत.












