न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२२) :- शहरातील मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी स्वतः मालमत्तेची नोंदणी केल्यास महापालिका सामान्य करात ५ टक्के सवलत देणार आहे. यासाठी महापालिका ‘माझी मिळकत माझी आकारणी’ या योजनेद्वारे स्वयंस्फूर्तीने मालमत्ता कराची नोंदणी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत दिली जाणार आहे. यासाठी १४ दिवसांत १५८ जणांनी अर्ज केले आहेत. मालमत्ताधारकांने महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणीसाठी अर्ज करून आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे.
नव्याने होणारी बांधकामे, वाढीव बांधकाम वापरात बदल अशा विविध प्रकारच्या मालमत्ता सतत वाढत असतात. या मालमत्तांना प्राधान्याने कर आकारणी होणे आवश्यक आहे. मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी मालमत्ताधारक स्वतः महापालिकेच्या संकेतस्थळावर मालमत्ता नोंदणीसाठी अर्ज करत असेल तर अशा मालमत्तांना सामान्य करात ५ टक्के सूट पहिल्या वर्षाकरिता दिली जाणार आहे. त्यासाठी १७ विभागीय कार्यालयामधून १५८ जणांनी अर्ज केले आहेत. तर महापालिकेने विशेष नोटीस दिलेल्या १० अर्जदारांनी नोंदणी केली आहे.
तर त्यांच्याकडून १ लाख २६ हजार ८५८ रुपये महसूल जमा करण्यात आला आहे. विशेष नोटीस नसलेल्या १४४ जणांनी स्वंयस्फूर्तीने ‘माझी मिळकत माझी आकारणी’ योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक थेरगाव विभागातून, चिखली २४ तर निगडी प्राधिकरण विभागातून ११ जणांनी अर्ज केला आहे.