न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२२) :- आरटीई रिक्त जागांवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील बालकांचा संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अद्यापही ३२ हजार ३२७ प्रवेशाच्या जागा रिक्तच असल्याने प्रतीक्षा यादीतील बालकांना प्रवेश घेण्यासाठी ३ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
याबाबतचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी जारी केले आहे. प्रतीक्षा यादीत २१ हजार ८५७ बालकांचा समावेश झाला असून आत्तापर्यंत यातील ६ हजार ५९४ बालकांचा शाळांमध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे.
पुणे जिल्ह्यातील ९५७ शाळांमध्ये १५ हजार १२६ प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या. यासाठी ६२ हजार ९६० बालकांचे अर्ज दाखल झाले होते. लॉटरीद्वारे १४ हजार ९५८ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली होती. त्यातील १० हजार ३७२ बालकांनीच प्रवेश घेतले. प्रतीक्षा यादीतून ४ हजार २१८ जागा उपलब्ध करुन दिल्या असून त्यातून केवळ ४४ प्रवेश निश्चित झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झालेली आहे.











