- अन्यथा पालिका नळजोड खंडित करून फौजदारी गुन्हा दाखल करणार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२२) :- शहरातील अनधिकृत नळजोड नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी १५ जूनपर्यंत नागरी सुविधा केंद्रात अर्ज करण्याची मुदत आहे. या मुदतीत अर्ज केल्यास दंडाच्या रकमेत सवलत दिली जाणार आहे. अर्ज न केल्यास नळजोड खंडित करून फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे, असा इशारा अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी (दि. २) दिला आहे.
शहरातील विविध भागात पाणी टंचाईबाबत तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पालिकेने अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. अनधिकृत नळजोड असलेल्या रहिवाशांकडून १५ जूनपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
त्यासाठी अर्जासोबत रहिवाशी पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्स, पॅन कार्ड, मिळकतकराचे बिल, वीजबिल इत्यादी कागदपत्रांची झेराक्स प्रत आवश्यक आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी केले आहे.














