- अजित पवारांचा शहर भाजपला मिश्कील टोला..
- विविध विषयावरून भाजपवर तुफान फटकेबाजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२२) :- तत्कालीन सत्ताधारी भाजपने केवळ कमिशन कशात मिळते तेच काम मार्गी लावले?. कुत्र्याची असली कसली नसबंदी केली?. पिंपरी चिंचवडचा पैसा आहे. घरचा नाही. राष्ट्रवादी सत्तेवर नसतानाही शहराची कामे होत आहेत. माझ्या विचारांच्या नगरसेवकांना सत्तेवर आणा; शहराचा पाच वर्षांचा बॅकलॉग भरून काढतो. ज्यांच्या अंगात पाणी नाही ते रोज काय पाणी देणार?, असा टोला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाजपला लगावला.
ते चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना अजीत पवार म्हणाले, पीएमआरडीएचे कार्यालय पिंपरी चिंचवडमध्ये होते ते पुण्यात का नेले?. नमामि इंद्रायणीचे काय झाले? लबाड घरचे आवतन जेवण मिळत नाही, अशी अवस्था आहे. शहराला २६७ एमएलडी पाणी कोटा मंजूर असताना देखील तो मिळत नाही. पवना धरण भरलेले असतानाही दिवसाआड पाणी धोरण लादले जातेय. पाण्यासाठी मी आयुक्तांना आता पुन्हा टेंडर काढायला लावलेय. पाणी मंजूर होऊन ते रद्द झाले तर केवढ्याला पडेल. मावळात आणि खेडमध्ये आमदारांची समजूत घालून पिंपरी चिंचवड शहराला पाणी आणू. मी आजही भाजपची मुदत संपल्यानंतरदेखील शहराला काही अडचण जाणवू दिली नाही.
कोरोना काळात औषध, गोळ्या इंजेक्शनसाठी पालिकेला मदत केली. उद्योगासाठी आधार केंद्र, शिक्षण आरोग्य, आणि स्वच्छतेवर भर देतोय. अतिक्रमणे काढली मात्र त्यांचे पुनर्वसन केले. सीएसआर सेलचे च्या माध्यमातून नवी कार्यक्रमाची आखणी आणि अमलबजावणी करतोय. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चांगल्या मोटर सायकली, स्टाफ, वाहने, पोलीस स्टेशनला मंजुरी असे सर्व काही दिले. मात्र, आमच्या आया-बहिणींना सुरक्षा प्रदान करा. मग तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्याला तडीपार आणि मोका लावा, अशा सूचना मी पोलीस आयुक्तांना केल्या आहेत. शहरातील ८७ चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. त्यानंतर ७६०० कॅमेरा बसविण्याचे नियोजन आहे.
चिंचवड स्टेशन, आनंदनगर, साईबाबानगर मधील झोपडपट्टीबाबत रेल्वे प्रशासन टोकाची भूमिका घेतय. जनता विकासाच्या पाठीशी का उभी राहत नाही? हा असा प्रश्न मला पडतोय?. महापालिकेत फक्त १०० दिवस सत्ता देऊन बघा कसा कायापालट करतो ते. अजूनही कोरोना गेलेला नाही. काळजी घ्यावी लागेल. अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील. डॉक्टरच्या सल्ल्याने बुस्टर डोस घ्या.














