- अन्यथा पक्ष ”एकला चला रे”चीच भूमिका घेण्याची शक्यता अधिक..
- शहर राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यास अजित पवारांचे मार्गदर्शन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२२) :- पद मिळाल्याने कार्यकर्त्यावर जबाबदारी येत असते. नव्या उमेदीने काम करा. तुमच्यासाठी चांगलं वातावरण करण्याचा प्रयत्न करतोय. राष्ट्रवादी घराघरात पोहोचवा. विरोधकांच्या अजेंड्यामागे फरफटत जाऊ नका; लोकांचे प्रश्न सोडवा. विकासाच्या मुद्द्यावर बोला. जुन्या नेत्यांना संधी दिली. आता नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यायचीय, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या वतीने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज शुक्रवारी (दि. ३) रोजी पदाधिकाऱ्यांच्या नूतन कार्यकारिणीस पदवाटप आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात संबोधित करताना अजित पवार बोलत होते. यावेळी आ. अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, संजोग वाघेरे, भाऊसाहेब, योगेश बहल, वसंत बोराटे, आझम पानसरे, जगदीश शेट्टी, प्रवीण भालेकर, युवक अध्यक्ष इम्रान शेख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, प्रभाग रचना जाहीर झाली. निवडणुकीत पक्षाचा शेवटी अंतिम निर्णय असतो. संधी नाही मिळाली तर घरी बसू नका, रुसू नका. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आणि संपूर्ण टीम निवडणूक लढविणार आहे. त्याला तुम्ही साथ द्या. ओबीसींना वंचित करायचे नाही. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर ओबीसी आरक्षणाचे काम चालू आहे. आज एकटे शरद पवार साहेब सोडले तर, राज्यातील तसेच देशातील किती राजकीय पक्षातील नेत्यांचे पिंपरी चिंचवड शहरावर प्रेम आहे. शरद पवारांचे वय झालेले असतानाही ते शहरात लक्ष घालतात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यात आणि जिल्ह्यात आम्ही समान कार्यक्रम घेऊन पुढे जायचे ठरवले आहे. स्थानिक निवडणुकीत मित्र पक्षांनी व्यावहारिक भूमिका घेतली तर, त्यांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे. अन्यथा पक्ष एकला चला रेची भूमिका घेण्याची शक्यता अधिक आहे.
योगेश बहल म्हणाले, अजितदादा विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन वाटचाल करीत आहेत. भाजपच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार बोकाळला. कोविड काळ, सुरक्षा, बायोमायनिंग अनेक कामात मोठा भ्रष्टाचार झाला. आम्ही सभाग्रहात आवाज उठविला. सत्ताधाऱ्यांनी उपसूचना देत काम रेटून नेले. कोट्यावधीची कामे लाटली.
अजित गव्हाणे म्हणाले, दादांच्या उपस्थितीमुळे आज शहर राष्ट्रवादीमय झाले आहे. राष्ट्रवादीने सत्ताकाळात पिंपरी चिंचवड शहराची ओळख उंचीवर नेली. मात्र, भाजपच्या पाच वर्षाच्या काळात शहराची अधोगती झाली. भाजपने भूल थापा मारून सत्ता मिळविली. कचरा, वैद्यकीय, स्थापत्य अशा विविध कामात मोठा भ्रष्टाचार केला. मागच्या पाच वर्षात नागरीकांच स्वप्न भंगल. स्मार्ट सिटीत केवळ साहेब आणि अजित पवारांमुळेच शहराचा समावेश झाला. निवडणुकीत यश-अपयश येत असतं. माझ्यावर दादांनी जो विश्वास ठेवून जबाबदारी दिली त्याला न्याय देणार. यंदा प्रभाग रचना राष्ट्रवादीला अनुकूल झाली आहे. पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादीचाच महापौर होणार. राष्ट्रवादीचे शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणार.














