न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२२) :- एकाच भागात राहणारे मित्र गुरुवारी (दि. ३) सकाळी नऊच्या सुमारास जुनी सांगवी येथील कचरा डेपोजवळ दारू पीत बसले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीकडे पाच हजार रुपये मागितले. मात्र, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, असे फिर्यादी म्हणाले. या रागातून आरोपीने फिर्यादीवर कोयत्याने वार केला.
त्यानंतर फिर्यादीच्या खिशातील एक हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. कोयता हवेत भिरकावून तुम्ही मदतीला आला तर सर्वांना ठार मारीन, अशी धमकी देत दहशत माजवली. याप्रकरणी लॉरेन्स बाबूराव सांगळे (रा. लमाण चाळ, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय ऊर्फ जोग्या हेमंत जाधव (वय २४ रा. जुनी सांगवी) असे आरोपीचे नाव आहे. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















