- पिंपरी ते निगडी अनं चिंचवड ते भोसरी विकासकामांची जोरदार फटकेबाजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महाराष्ट्र हॉकी औंध, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली.
या उदघाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, महाराष्ट्र हॉकीचे सचिव मनोज भोरे, क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, ह क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव, क्रीडाधिकारी अनिता केदारी, कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसेवक राजू बनसोडे यांच्यासह खेळाडू तसेच नागरिक उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आर्मी रोईंग नोड, सी.एम.ई, कासारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका परिसरातील विद्यार्थ्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रोईंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील, ब्रिगेडियर राजेश भट कमांडंट एफ कॉम्बेट सी.एम.ई, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांच्यासह माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, माजी नगरसदस्य अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, प्रसाद शेट्टी, विनोद नढे, राहुल भोसले, शाम लांडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी बोटद्वारे प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून माहिती घेतली. केंद्राचे समन्वयक कर्नल संदीप चहल यांनी केंद्र व केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण याबाबत माहिती दिली.केंद्रामार्फत वय वर्षे १३ ते १७ या वयोगटातील विद्यार्थ्यांना रोईंग प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकूण १५ विद्यार्थी खेळाडूंची रोईंग खेळाच्या प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात आली असून या खेळाडूंना रोईंग प्रशिक्षण आर्मी रोईंग बोड, सी.एम.ई. कासारवाडी यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राचा पाहणी दौरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. यावेळी आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, ज्ञानदेव जुंधारे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांच्यासह माजी महापौर योगेश बहल, अजित गव्हाणे, प्रा.कविता अल्हाट, विक्रांत लांडे, इम्रान शेख, विकास साने आदी उपस्थित होते.
शहरात १३ इको ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत. या कामाचा शुभारंभ निगडी येथील भक्ती शक्ती ते त्रिवेणीनगर चौकापर्यंत तयार करण्यात येणाऱ्या इको ट्रॅकचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला.
या भूमिपूजन प्रसंगी कोनशिलेचे यावेळी अनावरण करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सह शहर अभियंता सतीश इंगळे, क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहाल, माजी नगरसेवक तानाजी खाडे, सचिन चिखले, प्रसाद शेट्टी, अतुल शितोळे, नारायण बहिरवाडे, माजी नगरसेविका सुमन पवळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
इको ट्रॅकच्या कडेने विद्युत खांब उभारून तसेच वृक्षारोपण करून सुशोभित करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी, लँडस्केपिंगची कामे करण्यात येणार आहेत. ६ ते ८ मीटर रुंदीचे आणि १ हजार १०० मीटर लांबीचे मातीचे ट्रॅक तयार करण्यासाठी ९० लाख २७ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गंगानगर रोड येथे १ हजार सातशे पन्नास मीटर लांबीचा इको ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. तसेच बिजलीनगर ते आकुर्डी स्टेशन येथे १ हजार मीटर, धर्मराज चौक ते इस्कॉन मंदिर १ हजार मीटर, स्पाइन रोड सहकारनगर ते टाटा मोटर आठशे पन्नास मीटर, कोकणे चौक ते शिवाजीनगर (रहाटणी) येथे सातशे मीटर, नाशिक फाटा ते भोसरी येथे २ हजार मीटर, पिंपळे सौदागर येथे १ हजार पाचशे मीटर, वेणुनगर वसाहत येथे सातशे मीटर, स्पाइन रोड कृष्णानगर ते जाधववाडी येथील सरकार चौक येथे २ हजार चारशे पन्नास मीटर, सांगवी येथील पी.डब्ल्यू. डी. मैदान या ठिकाणी १ हजार पाचशे मीटर, चिखली येथील घरकुल ठिकाणी नऊशे मीटर आणि प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रासमोर पाचशे मीटर लांबीचे असे एकूण १५ हजार नऊशे पन्नास मीटर लांबीचे इको जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत. सदर इको ट्रॅकच्या प्रकल्पाला १२ कोटी पन्नास लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत उद्योग सुविधा कक्ष व सीएसआर सेलच्या उद्घाटनाने झाली. खाजगी संस्था आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नव्या योजना कल्पना तसेच कार्यक्रमाच्या माध्यमातून शहराच्या शाश्वत विकासात अधिकाधिक भर घालण्याच्या उद्देशाने सीएसआर सेल सुरु करण्यात आला आहे. यावेळी प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके आणि महापालिकेचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान, पोलिस दल, तृतीयपंथी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा ऑनलाईन कार्यप्रणालीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनांमध्ये महिला व बालकल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना तसेच इतर कल्याणकारी योजनांचा समावेश आहे.
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी मोटार सायकल हे प्रभावी माध्यम आहे. पोलीस पेट्रोलिंगसाठी ५० स्मार्ट मोटार सायकल्स हस्तांतरीत करण्यात आल्या. या मोटार घेणेकामी ५० लाख ९६ हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. तसेच यावेळी ग्रीन मार्शल पथकासाठी हेल्ड डिव्हाईसचे वितरण करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात हे डिव्हाईस तृतीयपंथीयांनी स्विकारले.
मनपा क्षेत्रातील अरुंद रस्ते, मार्केट परिसर तसेच दाटीवाटीच्या गल्लीबोळांच्या ठिकाणी तातडीने सहजपणे पोहोचून अधिक प्रभावी अग्निशमन सेवा देण्यासाठी फायटर मोटार सायकल्स अत्यंत उपयोगी आहेत. अशा ६ फायटर मोटार सायकल्सचे वाटप अग्निशमन विभागाला यावेळी करण्यात आले. या मोटार सायकल्स खरेदीकामी ८० लाख ८८ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.
भोसरी मधून आळंदीकडे जाणा-या मुख्य रस्ता बाजार पेठेतून जात असल्यामुळे याठिकाणी वाहनांना पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या समस्येवर मात करण्यासाठी प्रभाग क्र. ५ मध्ये सखुबाई गबाजी गवळी उद्यानात महापालिकेच्या वतीने बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. १४ हजार सहाशे बत्तीस चौरस मीटर जागेत उभारण्यात येणाऱ्या या वाहनतळासाठी ७ कोटी ८७ लाख ६३ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या वाहनतळाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले.
तळवडे गायरान येथे मातीचे पाथवे तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी २ हजार २०० मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक, नागरिकांना बसण्यासाठी कट्टे, लँडस्केपिंग, हॉर्टीकल्चरल विषयक कामे करण्यात आली आहेत. तसेच तळवडे येथे नागरिकांसाठी उद्यान विकसित करण्यात आले आहे. एक एकरमध्ये विकसित करण्यात आलेल्या या उद्यानात ३०० मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी, लँडस्केपिंग, हॉर्टीकल्चरल विषयक कामे करण्यात आली आहेत. हे उद्यान विकसित करण्यासाठी तसेच इतर अनेक अनुषंगिक कामे करण्यासाठी १ कोटी २५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. नव्याने विकसित करण्यात आलेल्या या उद्यानाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांच्यासह माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसदस्य पंकज भालेकर, प्रसाद शेट्टी, प्रविण भालेकर, अजित गव्हाणे, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर अॅकॅडमीच्या पॅव्हेलिअनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास खासदार श्रीरंग अप्पा बारणे, प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, माजी महापौर योगेश बहल, आर एस कुमार, संजोग वाघेरे, माजी नगरसदस्य डब्बू आसवानी, राजेंद्र साळुंके, सतीश दरेकर, संतोष बारणे, चंद्रकांत नखाते, नवनाथ जगताप, प्रशांत शितोळे, नाना काटे, कैलास बारणे, विनोद नढे, माजी नगरसदस्या माया बारणे, सहशहर अभियंता सतिश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे आदी उपस्थित होते.
शहरातील खेळाडूंना विविध प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपळे सौदागर येथे खेळाचे मैदान विकसित करण्यात आले आहे. या कामासाठी ५ कोटी ५४ लाख १९ हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. कुणाल आयकॉन रोडवरील उभारण्यात आलेल्या या अखिल भारतीय कबड्डी पंच स्वर्गीय बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ४ मेगापिक्सेल सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहरात सी.सी.टी.व्ही. बसविण्यात येत आहेत. याकामी १७८ कोटी ५७ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या सी.सी.टी.व्ही. यंत्रणा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, माजी नगरसदस्य नाना काटे, शत्रुघ्न काटे, अजित गव्हाणे, माजी नगरसदस्या शितल काटे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या वाकड येथील तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. आजपासून हे उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील, माजी राज्यमंत्री सचिन आहिर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे ,जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह शहर अभियंता सतीश इंगळे, क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, संदिप वाघेरे, माजी नगरसेविका अश्विनी वाघमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये उद्योग सुविधा कक्ष आणि औद्योगिक सामाजिक उत्तरदायीत्व कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी महापालिका, पोलीस आणि मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या प्रमुखांसमवेत झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते.
या चर्चेस महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स चे दीपक करंदीकर, प्रशांत हिरमणी, महापालिकेचे मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, उपआयुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, रविकिरण घोडके, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.