- बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादीचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रु.) :- भाजपच्या कारभारास जनता वैतागली आहे. निवडणुकीत दिलेले आश्वासन हवेत विरले असून, दिशाहीन कारभाराचा फटका सर्वसामान्य जनता व उद्योजकांना बसलेला आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे उदयोगांवर कुऱ्हाड कोसळली असून, देशातील व राज्यातील अनेक लघुउद्योग, तसेच सेवा क्षेत्र कोलमडले आहे. त्यामुळे हजारो रोजगार बुडीत निघाले व कामगार रस्त्यावर आले आहेत. त्याच्या निषेधार्थ व बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज बुधवार (दि. १३) रोजी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्राधिकरणातील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून, निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे व युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, नोटाबंदीनंतर दोन वर्षात सव्वा कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. नवा रोजगार निर्माण करण्यास शासनाला सपशेल अपयश मिळाले आहे. युवकांना दोन कोटी रोजगार देऊ, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी व भाजप सरकारने केंद्रात सत्तेत येण्यापुर्वी केली होती. सरकारने अपयश मान्य करून उपाय योजना करण्याऐवजी निर्लज्जपणे खोटी आकडेवारी जनतेच्या तोंडावर फेकण्यास सुरुवात केली. सरकारच्या सांख्यिकी, संशोधन तसेच सर्वेक्षण संस्थांचे अहवाल लोकांसमोर येऊ नयेत, याची तजवीज केली गेली. त्यामुळेच तरुणांचा संताप झाला आहे.

दहशतवाद, काळ्या पैशांचे कंबरडे मोडणारा सर्जिकल स्ट्राईक म्हणून या नोटबंदीचे ढोल पिटले गेले. प्रत्यक्षात कंबरडे मोडले ते ते रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योग-सेवा क्षेत्रांचे. नोटबंदी ही आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यासाठी केली असल्याचा निर्वाळा नंतर देण्यात आला. बेरोजगारीची परिणीती गुन्हेगारीची वाढ होण्यात झाली. शिक्षण घेऊन हाताला काम नसलेले बेरोजगार युवक गुन्हेगारीकडे वळले आहेत. त्यामुळे गेल्या पावणे पाच वर्षत पोकळ आश्वासनांचा अभ्यास करून उत्तरे देऊ, या भूमिकेचा, देशात चोहीकडे वाढतच जात असलेल्या बेरोजगारीचा व सरकारच्या फसव्या नीतीचा राष्टवादी काँग्रेस पक्ष निषेध व्यक्त करीत आहे.
आमच्या भावना आपल्या सरकारपर्यंत या निवेदनाच्या माध्यमातून शासनदरबारी पोहोचवा, अशी मागणी या पत्रात शहर राष्ट्रवादीने तहसीलदारांकडे केली आहे. या निवेदनावर शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, प्रवक्ता फाजल शेख, नगरसेवक नाना काटे, विद्यार्थी शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदीप गायकवाड, शाम जगताप व आदींच्या सह्या आहेत.











