- प्रशासकीय यंत्रणांना सूचना; मोदींच्या सभेमुळे गर्दी वाढणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२२) :- जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १४) होणार असल्याने या सोहळ्याच्या तयारीची पाहणी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. यावेळी त्यांना महाराष्ट्र राज्य आध्यत्मिक आघाडीचे भाजप अध्यक्ष तुषार महाराज भोसले, माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी माहिती दिली. महामेळावा असल्याने सर्वांनी या कार्यक्रमास यावे असे आवाहन जावडेकर यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा होणाऱ्या ठिकाणाला पोलीस छावणीचे स्वरूप आलेले असून संबंधित अधिकारी वारंवार या ठिकाणाला भेटी देत आहेत. सभेच्या मुख्य ठिकाणी ठिकाणी मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तत्पूर्वी या ठिकाणाचे सपाटीकरण करण्यात आले असून येत्या दोन दिवसात मंडपाचा ढाचा उभारणी पूर्ण होईल. मोदीच्या भाषणासाठीच्या स्टेजचे काम देखील सुरू झाले असून आतील कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. या संपूर्ण कामाचा आढावा माजी केंद्रीय मंत्री जावडेकरांनी घेतला.
पंतप्रधानांची सुरक्षाही महत्त्वाची असल्याने पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, सभास्थानी येताना नियोजित जागेवर वाहने उभी करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. सभा स्थानापासून जवळच हेलिपॅड करण्याच्या कामाला देखील सुरवात झाली आहे, अशी माहिती संस्थानकडून देण्यात आली.















