- अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२२) :- भोसरीला जाण्यासाठी फिर्यादी तरूण आंबेडकर चौकात थांबला होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचे आरोपी तिथे आले. गाडीची चावी मागण्याच्या कारणावरुन आरोपींनी तरुणाला शिवीगाळ केली. हाताने मारहाण केली. लोखंडी कोयता हातावर, डोक्यात मारुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार शनिवारी (दि. ११ जून) ११ वाजता पिंपरीतील आंबेडकर चौकात घडला. मनोज करण सिंग (वय २२, रा. शंकरवाडी, कासारवाडी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार यश देशमुख उर्फ गट्या (वय १७, रा. भाटनगर, पिंपरी) याच्यासह दोन अल्पवयीन मुले आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६-१७ वर्षाच्या अल्पवयीन मुलांना समजपत्र देऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.