- शाळेतील विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२२) :- लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण व्हावी. या उद्देशाने संभाजीनगर येथील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदे (स्टुडंट काउन्सिल) ची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत निवडणूक आणि लोकशाही प्रक्रियेचे धडे घेतले.
नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक वाटचालीबरोबर क्रीडा, सास्कृतिक आणि सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी हाती घेतले जातात. स्कुलमधील २०२२ – २३ शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी परिषदेची निवडणूक प्रक्रिया शुक्रवार दिनांक १५ जून रोजी पार पडली. विद्यार्थी परिषदेत इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांमधून हे़डबॉय, हे़ड गर्ल, स्पोर्ट्स हेड, अक्टिविटी हेड, कल्चरल हेड, हॉऊस प्रीफेक्ट, हाऊस व्हाईस प्रिफेक्ट अशा एकूण १६ जणांनी निवड करण्यात आली. विद्यार्थी परिषदेच्या या निवडणुकीत उमेदवार विद्यार्थ्यांनी एक दिवस प्रचार केला. नंतर प्रत्यक्ष मतपेटीव्दारे मतदान, मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये ९० शिक्षक व ६८० विद्यार्थी मतदारांनी मतदान केले.
उपक्रमाविषयी प्राचार्या मानसी हसबनीस म्हणाल्या की, “आपल्या देशातील लोकशाही संपूर्ण जगातील भक्कम व यशस्वी आहे. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान महत्वाचे आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वय वर्षे १८ नंतर प्रत्येक विद्यार्थी सजग नागरिक म्हणून मतदानाचा हा पवित्र हक्क बजावत असतो. विद्यार्थ्यांना आतापासून निवडणूक, मतदान, लोकशाही आणि संसदीय प्रक्रियेविषयी ज्ञान व्हावे. त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी. या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यता आला”.
नोव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. प्राचार्या मानसी हसबनीस, टेक्निकल हेड समिर जेऊरकर, विद्यार्थी परिषदेचे प्रमुख महेश नलावडे यांनी मार्गदर्शन केले.