न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रु.) :- महापौर राहुल जाधव यांनी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांना पत्र दिले असून, त्यात म्हटले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या वतीने पीएमपीएमएलला अनुक्रमे ६०-४० टक्क्यानुसार आर्थिक फंड दिला जातो.
पिंपरी चिंचवड मनपाकडून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) व्यवस्थापनाला प्रतीवर्षी ४० टक्के परतावा दिला जातो. त्यानुसार सन २००७ पासून पिंपरी चिंचवड महापालिकेने पीएमपीएमएलला ठरल्याप्रमाणे ४० टक्के हिश्याची रक्कम नियमितपणे अदा केली आहे. त्याबदल्यात नागरिकांना सार्वजनिक प्रवासी सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्याचे काम पीएमपीएमएल व्यवस्थापनाचे असते. परंतु, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पिंपरी चिंचवड मनपाला कायमच सापत्नपणाची वागणूक दिले जात आहे.
तसेच पूर्व पीसीएमटीच्या कर्मचा-यांना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यांची सेवाज्येष्ठता डावलली जात असल्याचे दिसून येते. पीएमपीची सेवा नागरिकांना व्यवस्थितपणे भेटत नाही. शहरासाठी बसची संख्या अपुरी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नेहमी जुन्या प्रकारच्या बस आढळून येतात. वेळेवर बस येत नसल्याने नागरिकांना कायम त्रासाला सामोरे जावे लागते. संचालक मंडळाची बैठक ठरलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित केली जात नाही. पीएमपीएमएल कंपनीचे अधिकारी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी व पदाधिकारी यांना सन्मानपूर्वक वागणूक देत नाही. त्यांनी दिलेल्या पत्रांना उत्तरे दिली जात नाहीत.
या बाबींचा विचार करता, स्थायी समितीने मंगळवार (दि. १२) रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे यांना संचलन तुटीची रक्कम देण्याचा मंजूर केलेला विषय तूर्त स्थगित ठेवण्यात यावा, असे या पत्रात महापौर राहुल जाधव यांनी म्हटले आहे.











