- ‘तेजस्विनी बस’ चे उद्या आमदार जगताप यांच्या हस्ते होणार उद्घाटन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने पिंपळे सौदागर परिसराचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश केलेला आहे. या परिसरात ७० टक्के लोकसंख्या ही आयटी क्षेत्रातील नोकरदार वर्ग असून, यात महिला व नोकरदार वर्गाचाही मोठा समावेश आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने या परिसरात ‘तेजस्विनी’ बसची फेरी सुरु करावी, अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी वाहतूक विभागाकडे केली होती. तसा प्रस्तावही काटे यांनी पीएमपीएमएलच्या वाहतूक व्यवस्थापक विभागाकडे पाठवीला होता.
शत्रुघ्न काटे यांच्या प्रस्तावाची पीएमपीएमएलने दखल घेतली असून, तसे पत्र काटे यांना पीएमपीएमएलने दिले आहे. अखेर पिंपळे सौदागरमध्ये तेजस्विनी बस धावणार आहे. पिंपळे सौदागर ते पुणे मनपा या तेजस्विनी बससेवेचा शुभारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्या शुक्रवार (दि. १५) रोजी होणार आहे, अशी माहिती शत्रुघ्न काटे यांनी दिली.











