- योजनांसाठी पालिकेची वाटचाल आता डिजिटलकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२२) :- महापालिका समाज विकास विभागाच्या ५९ योजना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा पैसा व वेळ वाचणार आहे. त्याशिवाय नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत ही योजना प्रत्यक्ष कार्यान्वित होऊ शकणार आहे. महापालिका समाज विकास योजनांसाठी अर्ज करण्यासाठी केंद्रात जावे लागते.
ही नवी यंत्रणा विकसित झाल्यानंतर नागरिकांना मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावर घरबसल्या योजनांसाठी अर्ज करता येणार आहे. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर त्यासाठी आवश्यक अर्ज अपलोड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
अर्ज ऑनलाइन उपलब्ध झाल्याने नागरिकांना अर्जाची नेमकी स्थिती समजू शकणार आहे. त्यामुळे नागरिकांना योजनेतील अर्थसहाय्य जमा केल्यानंतर ते मिळण्यास विलंब झाल्यास त्याचा तातडीने पाठपुरावा करणे शक्य होणार आहे. तसेच, अर्जात भरलेली माहिती आणि कागदपत्रांची खातरजमा करता येईल. नागरिकांना योजनांचा लाभ लवकरात लवकर देता येणार आहे. कार्यालयीन कामकाजासाठी असलेल्या सुट्टीच्या दिवशी देखील नागरिकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
महापालिका समाज विकास विभागाच्या ५९ योजना येत्या महिनाअखेरपर्यंत नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध होणार. या योजनांसाठी नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे त्यांची चांगली सोय होऊ शकेल
– अजय चारठाणकर, उपायुक्त, समाज विकास विभाग…