- ‘एनड्युरो चॅम्पियनशिप’ चे तळेगाव नूतन मध्ये भव्य आयोजन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रु.) :- नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूतन अभियांत्रिकी आणि एनसीईआरच्या मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘एनड्युरो ऑफरोड कार टेस्टिंग’ चॅम्पियनशिप’ या स्पर्धेचे पुणे जिल्ह्यात प्रथमच आयोजन करण्यात आलेले आहे. देशभरातील सुमारे दोन हजार अभियंते यामध्ये सहभागी होणार आहेत. शुक्रवारी ते सोमवारपर्यंत (दि.१५ ते १८ फेब्रुवारी) होणा-या या स्पर्धेमध्ये अभियंते स्वत: बनविलेली इलेक्ट्रिक कार सादर करणार आहेत. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेचा प्रेरणादायी अनुभव घेता येईल.
देशभरातील एकूण ७५ हून अधिक संघ यामध्ये सहभागी झाले असून, प्रत्येक संघामध्ये साधारणतः २५ विद्यार्थी असणार आहेत. ही स्पर्धा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प सादर करण्यासाठी उत्तम संधी असते. कार स्वतः डिजाईन करणे, कार तयार करणे, त्याचे अचुक आर्थिक नियोजन तसेच तयार केलेली कार विविध चाचण्यांमधून सक्षमपणे चालविणे या स्पर्धेतून शिकता येते.
एनड्युरो स्टुडन्ट इंडियाच्या या स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. ही स्पर्धा पहिल्यांदाच पुण्यात होत आहे. यापुर्वी दोन वर्षी एनआयटी जमशेदपूर, तिसऱ्या वर्षी फार्म्युला वन स्पर्धेमुळे प्रसिद्ध झालेले बुध्द इंटरनॅशनल- नोएडा, चौथी आणि पाचवी स्पर्धा कोइंबतूर येथे झाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया येथील ग्लेन हंप्रीज हे सुप्रसिध्द कार डिजाईनर या स्पर्धेस भेट देणार आहेत. परीक्षक म्हणून मर्सिडिज, फियाट कंपनीमधील वरिष्ठ तांत्रिक अधिकारी काम पाहणार आहेत. मॅग्ना हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. या स्पर्धेत पहिले तीन दिवस तयार केलेल्या कारचे तांत्रिक परीक्षण होणार असून दिनांक १८ रोजी प्रत्यक्ष चार तासांची एनड्युरो स्पर्धा होणार आहेत.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे निर्मिती प्रक्रियेमधील कौशल्य तयार व्हावेत, रेसिंग कारमध्ये या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीचे तंत्रज्ञान वापरले जावे, टीमवर्क आणि साहसीवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी कौशल्याधिष्ठीत अभियांत्रिकीसाठी कार्य करणाऱ्या एनसीईआर या संस्थेची निवड केली आहे असे आयोजकांनी सांगितले आहे.
स्पर्धेच्या आयोजनात नूतन संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष संजय भेगडे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेशभाई शहा, संस्थेचे विश्वस्त राजेश म्हस्के, रामदास काकडे तसेच पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, नूतन – पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन केले असून प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, डॉ. हरीश तिवारी, डॉ. ललितकुमार वधवा, प्रा. जीवन पाटील हे या स्पर्धेसाठी संयोजन करीत आहेत. प्रा. संतोष शेळके हे स्पर्धेचे नियोजन करत आहेत.











