न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०२२) :- ‘पीएमपी’ ही पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांची लाइफलाइन आहे. प्रवाशांचे या सेवेशी दृढ नाते आणखी घट्ट होण्यासाठी आणि त्यांच्याशी सुसंवाद वाढविण्यासाठी शहर परिसरात ‘पीएमपी’च्यावतीने ‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या संकल्पनेतून येत्या १ ते ३१ जुलै दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. यात उत्कृष्ट लेख, कविता, छायाचित्र, व्हिडिओ आदींचा समावेश असणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास एक वर्ष सर्व मार्गांसाठी मोफत प्रवास बस पास, द्वितीय क्रमांकासाठी सहा महिन्यांचा बस पास आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यासाठी तीन महिन्यांचा बस पास बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सहभाग नोंदवता येणार आहे.
ज्या प्रवाशांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यांनी त्यांचे लेख, कविता अथवा छायाचित्र अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या नावे ‘पीएमपी’च्या मुख्य स्थानकांवर ठेवण्यात येणाऱ्या पेटीमध्ये जमा करावे. शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच संस्थांचे प्रतिनिधी एकत्रितपणे या स्पर्धेत सहभाग नोंदवू शकतात.
स्पर्धेत ऑनलाइन सहभागी होण्यासाठी pmpmlcontest@gmail.com या ई-मेलवर व ९०११०३८१४९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर वरती लेख, कविता, फोटो व व्हिडिओ पाठवावेत. तसेच, सर्व बसमध्ये स्पर्धेचे माहिती पत्रक लावण्यात येणार असून त्यावर ऑनलाइन क्युआर कोड असणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त प्रवाशांनी सहभागी होण्याचे आवाहन पीएमपी प्रशासनाकूडन करण्यात आले आहे.














