न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झालेला आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी भव्य-दिव्य अशा विकासकामांची निर्मिती झालेली आहे व काही कामे मार्गी लागण्याच्या अवस्थेत आहेत. तसेच महापालिकेने काही कोटी रुपये खर्च करून, शहरात अनेक ठिकाणी अशी विकासकामे मार्गी लावलेली आहेत. या विकासकामांच्या माध्यमातून त्या-त्या परिसराची एक विशिष्ठ अशी ओळख निर्माण होते असते.
या विकासकामांना महापुरुषांची नावे दिली, तर एक वेगळाच जनसंदेश नागरिकांमध्ये जात असतो व त्यांच्या कार्याची देखील माहिती जनसामान्यांना होत असते. शिवसेना नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शहरातील विकासकामांना महापुरुषांची नावे देण्यात यावीत, यासाठी मागणीचे पत्र दिले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील विविध विकासकामांना महापुरुषांची नावे द्यावीत. जेणेकरून नागरिकांमध्ये महापुरुषांच्या विचारांचा पगडा निर्माण होईल. यात महापालिकेने मोशी ते प्राधीकरण या दरम्यान उभारलेल्या स्पाईन रस्त्यास “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पाईन रोड” तसेच सांगवी ते किवळे या दरम्यान उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्गाला “श्री छत्रपती शिवाजी महाराज बीआरटी मार्ग” व नाशिक फाटा ते वाकड या दरम्यान उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्गाला “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बीआरटी मार्ग” अशी नावे देण्यात यावीत.
शहराच्या विकासाचा नावलौकीकपणा विकासकामांना महापुरुषांची नावे देण्याने आणखी वाढणार आहे. तसेच शहरातील सर्व नागरिकांसाठी ही बाब अभिमानस्पद ठरेल. तरी आपण लवकरात लवकर विकासकामांच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करावा, असे या पत्रात नगरसेवक भोसले यांनी म्हटले आहे.















