न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२२) :- वाकड येथील भूमकर चौकातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी (दि. १) पासून तीन रस्त्यांवर वन-वे (एकेरी मार्ग) केला आहे. वाहनचालकांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक लावून वाय जंक्शन येथे बॅरिकेड लावले आहेत.
कस्तुरी चौक ते भूमकर चौक वाय जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना बंदी असेल, त्यांना कस्तुरी चौक ते विनोदे चौक (कॉर्नर) मार्गे वाय जंक्शन असा पर्यायी मार्ग असेल. वाय जंक्शन येथील यू-टर्न व विनोदे कॉर्नरकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी आहे, त्यांना वाय जंक्शन ते कस्तुरी चौकातून उजवीकडे वळून विनोदे चौक पर्यायी मार्ग असेल.
हे दोन्ही रस्ते प्रायोगिक तत्त्वावर बंद केले आहेत. त्यांना पर्यायी मार्ग दिले आहेत. तसेच, वाय जंक्शन येथील यू-टर्न बंद केला आहे. एकेरी वाहतूक मार्गाबाबतच्या सूचना नागरिकांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात वाहतूक शाखेकडे १४ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात. त्या विचारात घेऊन अंतिम आदेश काढण्यात येईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त आनंद भोईटे यांनी दिली.















