न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२२) :- निगडी ओटास्कीम येथील सिद्धार्थनगर येथे एक महिला गांजा विक्री करताना आढळली. तिच्याकडून ३० हजार ७६० रुपयांचा एक किलो २१० ग्रॅम गांजा पथकाने जप्त केला. हा गांजा तिने दुसऱ्या महिलेकडून आणल्याचे सांगितले.
त्यानुसार त्या महिलेच्या घराची झडती घेतली असता एक लाख ९ हजार ८०० रुपये किमतीचा तीन किलो ९१६ ग्रॅम गांजा सापडला. तिने हा गांजा दुसऱ्याकडून आणल्याचे सांगितले. या कारवाईत पाच किलो १२६ ग्राम वजनाचा गांजा, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण एक लाख ४० हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने ही कारवाई केली. निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून सावळा शिवाजी खाडे (रा. सिद्धार्थनगर, निगडी) याच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल असून दोन महिलांना अटक केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.















