- राज्यातील प्रथम MMA चॅम्पियनशिप स्पर्धा पिंपळे सौदागरमध्ये संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच पिंपळे सौदागर येथे राज्यस्तरीय ” मिक्स मार्शल आर्ट (MMA) चॅम्पियनशिप २०२२ ” या स्पर्धेचे शनिवारी (दि. २) रोजी आयोजन करण्यात आले होते. अत्यंत रोमहर्षक लढती पाहण्यास परिसरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
या स्पर्धेस पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नाना काटे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, सौ. अनिता काटे, उद्योजक संदीप काटे, आण्णा शेलार, संजय मंगोडेकर, राजू शेलार, MMA चे इंडिया प्रेसिडेंट शरीफ बापू, युनिव्हर्सल जिमच्या डायरेक्टर पल्लवी पाटील, नरेश म्हेत्रे आदी उपस्थित होते.
फ्ले (flay weight) या वजन प्रकारात प्रथम क्रमांक आशिष बागल याने तर बंटम (bantam weight) वजन प्रकारात गणेश गोटावदे याने प्रथम क्रमांक पटकावत दहा हजारांचे पारितोषिक पटकावले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुंदाताई भिसे म्हणाल्या, अॅक्शन चित्रपट बहुतेकांना आवडत असतीलच. या चित्रपटांमधील फाईट्स संपूर्ण चित्रपटाचा रोमांच वाढवत असतात. पण जे चित्रपटामध्ये दाखवले जाते, ते कधी खऱ्या आयुष्यामध्ये घडत नसते. खऱ्या आयुष्यामध्ये देखील सेल्फ डिफेन्ससाठी म्हणजे स्वत:चे आपल्या शत्रूपासून रक्षण करण्यासाठी मिक्स मार्शल आर्ट (MMA) फायदेशीर ठरते. विवेकी डावपेच, उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धक खऱ्या अर्थाने स्वतःला सुरक्षित करू शकतो.