न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :- केंद्र शासनाच्या नियंत्रण मंडळाच्या अधिपत्याखालील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेतर्फे पिंपरी चिंचवड मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील प्रस्तावित वैद्यकीय पदव्युत्तर संस्थेस एकुण सात विषयात शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० पासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित विषयास मान्यता दिली आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली आहे.
यातील विशेष महत्त्वाची बाब अशी की, केंद्र शासनाच्या आवाहनानुसार अशा प्रकारची वैद्यकीय पदव्युत्तर संस्था प्रस्तावित करून, त्यासाठी परवानगी प्राप्त करणारी व संस्था सुरू करणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही भारतातील पहिली संस्था आहे.
यात पुढील शाखांसाठी मान्यता मिळालेली आहे. १) कान, नाक, घसा – ३, २) भुलशास्र – ४, ३) मानसोपचार – ३, ४) स्त्रीरोग व प्रस्तुती – ३, ५) बालरोग – ४, ६) विक्रुती शास्र – ३ ७) अस्थिरोग – ४
संस्थेच्या उभारणीत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे मार्गदर्शन व योगदान फार महत्त्वाचे आहे. खेरीज मनपा क्षेत्रातील खासदार, आमदार, महापौर, सत्तारुढ पक्षनेते तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नगरसेवक तसेच मनपाचे इतर अधिकारी यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले आहे. या संस्थेच्या स्थापनेसाठी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. पदमाकर पंडित, त्यांचे अध्यापक सहकारी व मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी वेळोवेळी योग्य ते प्रयत्न केले आहेत.
भोसरी रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव आणून, आयुक्त काय दाखवणार आहेत? आता तर वायसीएम रुग्णालयाला महाविद्यालयासाठी मान्यताच मिळालेली आहे. शासनाचे अनेक MBBS डॉक्टर PG साठी येणार आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना याचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी भोसरी रुग्णालय खाजगीकरणाचा प्रस्ताव रद्द करावा. एकीकडे सध्याचे प्रशासन वायसीएम सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि आयुक्त खाजगीकरणाचा डाव आखत आहेत. – विकास भुंबे (अध्यक्ष – आधार सोशल फौंडेशन)











