- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या त्या फोटोची खुद्द अजितदादांनाही भुरळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२२) :- बाबा कांबळे यांचा १९९७ मधील एक फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने व्हायरल झाला. त्यामुळे संपूर्ण नेटकऱ्यांमध्ये त्याची चर्चा सुरू आहे. या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने व्हायरल झालेल्या फोटोची खुद्द माजी उपमुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनाही भुरळ पडली आहे. त्याची शहनिशा करण्यासाठी थेट महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष तथा कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांना फोनही केला.
अजितदादा म्हणाले, ” बाबा तो फोटो तुझा आहे का रे, शिंदेचा फोटो, शिंदेचा फोटो असं काय सांगतात ” ? मग बाबांनी खुलासा केला असता मिश्कीलपणे हसत बाबांना काम सुरु ठेवण्याचा सल्ला दिला.
रिक्षा चालक-मालक, घरेलू कामगार महिला, पथारी, हातगाडी, टपरीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करणारे नेतृत्व बाबा कांबळे यांचे आहे. उपोषण, मोर्चे, धरणे आंदोलन करत महापालिका प्रशासन, राज्य शासनाला धारेवर धरून अनेकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. पुढेही हे काम चालूच आहे. आपल्या कामातून लोकांच्या मनात उतरलेले बाबा कांबळे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.














