- तर, नऊ हजारांपेक्षा अधिक जणांमध्ये मलेरियासदृश आजाराची लक्षणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात जूनच्या तुलनेत जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला याबरोबरच डेंग्यू आणि मलेरियासदृश्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. महापालिका वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीनुसार २९ जुलैपर्यंत डेंग्यूचे ५०३ संशयित रुग्ण आढळले. तपासणीमध्ये ३७ जणांना डेंग्यूची लागण झाली.
९२७९ जणांमध्ये मलेरियासदृश आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच आसपास डबकी देऊ नये. परिसर स्वच्छ राखण्याची गरज आहे. घरात पाणी साठविण्याच्या सर्व भांड्यांतील पाणी वापरून भांडी रिकामी करून कोरडी करावीत. त्यानंतर पुन्हा पाणी भरावे. घरातील मोठ्या टाक्या ज्या रिकाम्या करता येणे शक्य नाही. त्यांना घट्ट झाकण बसवावेत. घरातील फ्लॉवर पॉट, कुलर व फ्रीजच्या खालच्या ट्रेमधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावे. तसेच नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळावे. पूर्ण कपडे घालावे. सकस आहार घ्यावा. घरात स्वच्छता राखावी.
डेंग्यू , चिकुनगुनिया हे आजार पसरवण्यास एडिस इजिप्ती हे डास कारणीभूत असतात. ताप, डेंग्यू, चिकुनगुनिया झालेल्या व्यक्तीस डास चावला तर रोगाच्या रक्तातील विषाणू त्या डासाच्या शरीरात शिरतात. असा विषाणूजन्य डास निरोगी माणसास चावल्यास त्याला ताप, डेंग्यू, चिकुनगुनिया होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे डेंग्यूची कोणतीही लक्षणे दिसल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त, आरोग्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.


















