न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकासकामांच्या निविदेत रिंग केलेल्या ठेकेदारांना संबंधित कामाचा ठेका न मिळाल्यामुळे त्या तीन ठेकेदारांनी स्थायीच्या सदस्यांना हाताशी धरून कमी दराने निविदा भरलेल्या त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. हा चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यागत प्रकार आहे. या प्रकाराबाबत माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट वाकड, रावेत, गहुंजे, किवळे येथील विविध संस्थाच्या कामाच्या तब्ब्ल १०५ कोटी ५५ लाख रुपये खर्चाच्या निविदेत मे. व्ही. एम. मातेरे, धनेश्वर कंस्ट्रक्शन व मे. कृष्णाई इन्फ्रास्ट्रचर या तीन ठेकेदारांनी रिंग केली आहे. मात्र, अजवानी कंस्ट्रक्शन यांनी रिंग तोडून कमी दराच्या निविदा भरल्या व काम पदरात पाडून घेतले. त्यामुळे त्या चिडलेल्या ३ ठेकेदारांनी स्थायी समितीला हाताशी धरून, मे. अजवानी या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून, फौजदारी दाखल करण्याची मागणी केली.
त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार घडला आहे. रिंगमध्ये सामील खरे ठेकेदार मे. व्ही. एम. मातेरे, धनेश्वर कंस्ट्रक्शन व मे. कृष्णाई इन्फ्रास्ट्रचर या तीन ठेकेदारांनी रिंग करून, १० ते १६ टक्के जादा दराच्या निविदा भरल्या होत्या. मात्र, अजवानी यांनी १० टक्के कमी दराच्या निविदा भरल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान टळले.
उलटपक्षी ते तीन ठेकेदारच रिंग करून महापालिकेचे आर्थिक नुकसानीस जबाबदार आहेत. त्यामुळे आयुक्तांनी मे. व्ही. एम. मातेरे, धनेश्वर कंस्ट्रक्शन व मे. कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर या तीन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी वाघेरे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.











