- सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय..
- शिंदे-भाजप सरकारचे भवितव्य घटनापीठाच्या निकालावर अवलंबून…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२२) :- महाराष्ट्रात नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच मात्र कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत ‘तारीख पे तारीख’चं सत्र सुरु झालं आणि जूनपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या सलग चार तारखा लांबणीवर गेल्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे.
सरन्यायाधीश रमण्णा यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असणाऱ्या मुद्यांबाबत सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे निर्देश यावेळी देण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रमण्णा हेच घटनापीठ स्थापन करण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रमण्णा २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. घटनापीठासमोर काही मुद्यांवर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव प्रलंबित असताना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करू शकतात का? या दरम्यान सभागृहाचे कामकाज कसे सुरू राहिल? राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका या मुद्यांवर घटनापीठ सुनावणी करणार आहे.
शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे त्यांनी आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वतीनं तातडीनं मेन्शन करण्यात आलं. त्यामुळे आज अखेर या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.















