न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने साडेचार महिन्यांत ३०० कोटी रुपये वसुलीचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक १८६ कोटींचा भरणा ऑनलाइन माध्यमातून झाला आहे. पुढील साडेसात महिन्यांत विभागास ६९३ कोटींची वसुली करण्याचे टार्गेट पूर्ण करायचे आव्हान आहे. कर संकलन विभागाकडून निवासी व बिगरनिवासी मिळकतींना कर आकारून त्यांची विविध १७ विभागीय कर संकलन कार्यालयांकडून वसुली केली जाते. कर संकलन विभागाकडे ५ लाख ७८० हजार मिळकतींची नोंद आहे.
मिळकतकरांच्या बिलाची वसुली १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ अशी वर्षभर केली जाते. एक एप्रिल ते २२ ऑगस्ट या साडेचार महिन्यांच्या कालावधीत एकूण ३०६ कोटी ९१ लाख ४३ हजारांचे उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. आतापर्यंत एकूण लाख २६ हजार ५ मिळकतधारकांनी बिल भरले आहे. सर्वाधिक १८६ कोटी १८ लाख हजारांचा भरणा ऑनलाइन माध्यमातून झाला आहे. त्याद्वारे एकूण १ लाख ४९ हजार २७९ मिळकतधारकांनी बिल भरले आहे. रोखीने ४३ हजार १८० नागरिकांनी ३२ कोटी ९५ लाख २६ हजारांचा भरणा केला आहे. तर, धनादेशाद्वारे १० हजार २५४ जणांनी ४१ कोटी ७८ हजार ७१ हजार रूपये जमा केले आहेत. डीडीद्वारे १७७ मिळकतधारकांनी ७ कोटी ६४ लाख ७० हजार जमा झाले आहेत. दरम्यान, कर संकलन विभागासमोर वर्षभरात १ हजार कोटींचे वसुलीचे टार्गेट आहे. आतापर्यंत सुमारे ३ लाख ५२ हजार मिळकतधारकांनी बिल भरलेले नाही. पुढील साडेसात महिन्यांत ६ कोटींची वसुली करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे..
शहरातील मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात येत आहेत. नोटीस मिळाल्यानंतर मुदतीमध्ये बिल अदा न केल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी थकबाकीसह मूळ मिळकतकर असे संपूर्ण बिल भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
















