न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२२) :- चिंचवडच्या श्री. गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या जेष्ट संचालिका मा. नगरसेवक श्रीमती. अनुराधा गोरखे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. श्रीमती. गोरखे या गेली बावीस वर्षे राजकीय व सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या स्थापनेपासून त्या बँकेच्या संचालिका आहेत.
बँकेचे अध्यक्ष स्व. मधुकर बाबर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाल्याने चिंचवडच्या श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. नियमाप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्यातर्फे अध्यासी अधिकारी नवनाथ अनपट (भोसले), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली (दि. १) रोजी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
नवनिर्वाचित अध्यक्षा श्रीमती. अनुराधा गोरखे यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानून पुढील काळात बँकेच्या प्रगतिसाठी कटिबद्ध राहू, असे मनोगत व्यक्त केले. या निवडणूक प्रक्रियेवेळी उपाध्यक्ष रमेश वाणी, संचालक दिलीप देशमुख, शंकर वाडकर, आनंदराव निकम, अशोक काळभोर, अतुल इनामदार, धर्मेंद्र थारेवाल, वंदना भांगडिया, वत्सला जाधव, अमित चौकडे, अभयकुमार आपटे उपस्थित होते.















