न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रु.) :- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी (दि. १४) रोजी पुलवामा जिल्ह्यात भीषण आत्मघातकी हल्ला केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेने आज बुधवार (दि. २०) रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. तत्पूर्वी सभेस आरंभ होण्याआधीच भाजपाच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी पुलवामा येथील शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात यावी, अशी सूचना मांडली.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सर्व पक्षीय नगरसेवकांच्या वतीने भ्याड हल्ल्याचा निषेध करून, सभा तहकूब करण्याच्या सूचनेस अनुमोदन दिले. यावेळी शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. महापौर राहुल जाधव यांनी पुढील सभा शुक्रवार (दि. २२) रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतपर्यंत तहकूब केली आहे.
या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले आहेत. सुट्टी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २ हजार ५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. प्रत्येक वेळी एक हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला.











