- शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचा रहाटणीत दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२२) :- आम्ही मुळातच भाजप-शिवसेना एकत्र आहोत. अगदी मुंबई महापालिकेत आमचे १५० पेक्षा जास्त अस्तित्वातले नगरसेवक आहेत. त्यामुळे आम्ही मुंबई महापालिका जिंकू, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका जिंकू, सगळ्या नगरपालिका तर जिंकूच पण सगळ्या जिल्हा परिषदा सुद्धा जिंकू, असा विश्वास शिंदे गटाचे प्रवक्ते व शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
रहाटणीतील एका खासगी शिक्षण संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी केसरकर यांनी संवाद साधला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आदी उपस्थित होते.
शिवसेना आणि शिंदे गटातील सर्वोच्च न्यायालयीन प्रक्रियेबाबत बोलताना ते म्हणाले की, न्यायालयाच्या कामकाजाबाबत काही बोलणार नाही. लोकशाही मजबूत करणारे निकाल असतील अशी मला खात्री आहे.
शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांचा की शिंदे गटाचा होणार याबाबत विचारले असता मंत्री केसरकर म्हणाले की, ‘आमचे मुख्यमंत्री खूप काम करतात. लोकांच्या आनंदात सहभागी होतात. दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री शिंदे घोषणा करतील. मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ आहेत. म्हणून बाळासाहेबांच्या विचारासाठी जशा लढा दिला. तसेच त्यांच्या प्रथा-परंपरा कायम ठेवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. परंतु, दसरा मेळाव्याबाबत काय करायचे याच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांबद्दल त्यांना असलेला आदर आणि बाळासाहेबांची भूमिका, व्यापक हिंदुत्वाचे तत्व पुढे घेऊन शिंदेसाहेब चालत आहेत. त्यात कुठलेही राजकारण येऊ देणार नाही.


















