न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२२) :- एखाद्या सोसायटीचे कन्व्हेयन्स डीड झाले तरी जोपर्यंत प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव येत नाही, तोपर्यंत कायदेशीरदृष्ट्या इमारतीवर सोसायटीची पूर्णपणे मालकी होत नाही. त्यासाठी तीन ते चार टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनी दिली.
सोसायटी राज्य सरकारच्या सहकार खात्याच्या वतीने मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) ‘ सोसायट्यांचा पुनर्विकास, वाहनतळ देखभाल ‘ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी आघाव बोलत होते.
चिंचवड येथील एस. के.एफ. एम्प्लॉइज हॉल येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी सहकारी संस्था पुणे शहर ३ चे उपनिबंधक नवनाथ अनपट – भोसले, अॅड. प्रज्ञा पाटील, महापालिकेचे उपअभियंता विजय भोजने, पंकज थोरात उपस्थित होते.
आघाव म्हणाले, मालमत्ता सोसायटीच्या नावाने व्हायला हवी. सोसायटीच्या नावे असलेले वीज देयक, पाणी देयक हे दुय्यम पुरावे आहेत. प्रॉपर्टी कार्डवर जोपर्यंत नाव येत नाही तोपर्यंत मालमत्ता सोसायटीच्या नावावर होत नाही. पूर्णत्वाचा दाखला नसला तरी मानीव अभिहस्तांतरण करता येते. मालमत्ता बाधकाम व्यावसायिकाच्या नावे असल्याने अशा मालमत्तांवर काही बांधकाम व्यावसायिकांनी कर्ज काढल्याच्या घटना घडल्या. सोसायटी स्थापन झाल्यावर चार महिन्यांत कन्व्हेयन्स डीड व्हायला हवे. तंटामुक्त सोसायटी योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अर्ज करावा लागतो. तो अर्जसुद्धा अनेक सोसायट्या देत नाहीत.
अॅड. पाटील म्हणाल्या, ” प्राधिकरण, चिखली, पूर्णानगर, तळेगाव एमआयडीसी येथील भाडेपट्टा करार असलेल्या इमारतींच्या कन्व्हेयन्स डीड होण्यासाठी सरकारी पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
भाडेपट्टा कराराविषयी अनपट – भोसले म्हणाले, ‘ कन्व्हेयन्स डीड करण्यासाठी अनेक सोसायट्या पुढाकार घेत नाहीत. शहरात भाडेपट्टा तत्त्वावर जागा देऊन मोठ्या प्रमाणात घरे बांधलेली आहेत. भाडेपट्टा करार आणि कॅन्व्हेयन्स डीड या बाबी जवळपास सारख्याच आहेत. पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आता बरखास्त झाले आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना आता इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेशी संपर्क साधावा लागणार आहे.