न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रु.) :- शिवसेना व भाजप यांची अखेर युती झाली आहे. शिवसेना सत्तेत असूनही विरोधी भूमिका घेत, प्रसंगी भाजपला विरोध करीत राहिली. हा विरोध एवढा टोकाचा होता की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कारभारास औरंगजेबाची उपमा दिली होती. त्यामुळे दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांचा एकमेकांसमोरच मनमुटाव झाला होता. त्यात भाजपने आपल्या मुख्य हिंदुत्व या मुद्द्यापासून फारकत घेतली व हिटलरशाही कारभार सुरु केला. या हिटलरशाही कारभाराला वेळप्रसंगी शिवसेनेनेही आक्रमकपणे उत्तर दिले. त्यात पक्षाचे नेते तसेच कार्यकर्तेही पक्षप्रमुखांच्या पाठीशी उभे होते. त्यामुळे मुख्य विरोधक म्हणून शिवसेनेने आपली प्रतिमा निर्माण केली होती. परंतू, आज हीच प्रतिमा शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी करीत, युती करून डागाळून घेतली आहे. बाळासाहेबांचा शिवसेना हा पक्ष नैतिक मुल्यांवर अपयशी ठरला आहे. त्यामुळे अनैतिक पक्षाशी फारकत घेत, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शिवसेनेशी काडीमोड केला आहे.
याबाबत भापकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी सन १९८२-८३ सामाजिक, राजकीय कामाची सुरवात शिवसेना पक्षातुन केली. सन १९९६ पर्यंत मी शिवसेनेत सक्रिय होतो. या काळात लोकसभा विधानसभा, महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना या पक्षासाठी निस्वार्थ भावनेने काम केले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विधानसभेवर भगवा ध्वज फडकविण्याचे स्वप्न साकार होण्यासाठी सन १९९५ विधानसभा निवडणुकीत रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करुन, हवेली विधानसभेवर त्यावेळचे शिवसेना उमेदवार गजानन बाबर यांना निवडुन आणण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न केले. मात्र, महाराष्ट्रात शिवसेना भाजपाची सत्ता आल्यांनतर पिंपरी चिंचवड शिवसेनेच्या स्थानिक कुरघोडीच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी पक्षातून बाजुला झालो. त्यानंतर पर्यायी राजकारणाचे नवनविन प्रयोग करीत सामाजिक, राजकीय काम करीत गेलो. मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत २००७ ते २०१२ अपक्ष नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जेष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे, मेधा पाटकर, आम आदमी पार्टी, स्वराज इंडिया, शेतकरी लढे, कामगार चळवळीमध्ये मी सक्रिय काम करत गेलो.
सन २०१७ महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार सदस्य प्रभाग पध्दतीने निवडणुक होणार असल्यामुळे मला भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्वच पक्षांची उमेदवाची ऑफर होती. मात्र एका विशिष्ट परिस्थितीत मी जनतेचा व कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेऊन, काही अटी शर्तीवर शिवसेनेत आपल्या उपस्थित प्रवेश केला. मला शिवसेनेने काळभोरनगर प्रभाग क्र. १४ मधून उमेदवारीही दिली. त्यात मी प्रमाणिकपणे शिवसेनेच्या इतर तीन उमेदवारांना निवडणून आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र शिवसेना नेत्यांनी षडयंत्र रचून माझा निसटता पराभव घडवून आणला, असे असताना मागील दोन वर्षापासून महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या विरोधात कायम संघर्षाची भूमिका घेऊन मी लढत आहे. शहरात वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असताना अनियमित बांधकामे, शास्तीकर शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी या विषयाबाबत आंदोलन करीत असताना. हे भापकरांचे वैयक्तीक आंदोलन आहे. शिवसेनेचा त्याच्याशी काडीचा संबंध नाही, असे म्हणून सेनेने अलिप्त राहणे पसंत केले.
सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने सेनेबरोबरची युती तोडून स्वतंत्र निवडणुक लढवली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय मंत्री राज्यातील सर्व भाजपाचे नेते शिवसेनेवर तुटून पडले. त्यावर आपण एकाकी लढताना, हे दिलीश्वरांचे आक्रमण असून, अदिलशाही, निजामशाही, कुतबशाही, मोघलशाहीचे आक्रमण आहे, असे म्हणत आपण औरंगजेब, अफजलखान, शाईस्तेखानाशी भाजपाच्या नेत्यांची तुलना केली. त्यावेळी आपण ऐकटे पडत आहात म्हणून आपल्याबद्दल राज्यात मोठी सहानभुती निर्माण होऊन, आपल्या पाठीशी लोक उभे राहीले. व सेनेला ६३ आमदार निवडून दिले.
त्यानंतर आपण विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर आपण सत्तेत सहभागी झालात. मागील साडेचार वर्षात नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभात व माध्यमांच्या प्रतिनिधीसमोर तावातावने आता यापुढे एकटी शिवसेना महाराष्ट्रावर भगवा फडकवेल. तुम्ही मला तुमची वज्रमुठ द्या. दात पाडायचे काम मी करतो. पटकीचा रोग माहीती आहे. पटकनेवाला पैदा नहीं हुआ, माझ्या घरात घुसून तुम्ही माझ्या मुळावर येत असाल तर मी तुमची पंचारती करु.
मी असे म्हणतो शिवेसेनेला ५० वर्षे झाली. त्यातील आपली २५ वर्ष सडली, “हर हिंदू की यही पुकार पहीले मंदीर फिर सरकार” अशी जाहीर वक्तव्य आपण दिली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ तारेखेला दाखवून देऊ भाजपाची औकात काय? तुमच्या गुहेत घुसून वाघाचे दात मोजू शकतो. लक्षात ठेवा माझे देखील कुलदैवत इंदापुरचे सिना नरसृह पुरीचा नरसिंह आहे. मी भ्रष्टाचाराचा कोठाळा काढल्याशिवाय थांबणार नाही. महाराष्ट्र सरकारचा कुठलाही विभाग असो अथवा मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अंतीम स्वरुप देऊ. नामदार दिवाकर रावते यांनी जनतेच्या कामासाठी सरकारमध्ये आहे. ते होणार नसतील तर राजीनामे खिशात आहेत.
सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शिवसेना शिवसेना आहे. मोठा भाऊ हा मोठा भाऊ आणि बाप हा बाप असतो. बाप कसा काय बदलणार, कुठल्या प्रस्तावासाठी शिवसेना मुंडवळ्या बांधून बसली नाही. प्रप्रोजची वाट पाहत महाराष्ट्रात कोणाबराबर ही युती करणार नाही. तेव्हा म्हणाले गाढा आम्ही गाढले गेलो नाही. राष्ट्रीय कार्यकारणीचा ठराव म्हणजे बेडकांचा ठराव नसतो. त्याला महत्व असते. भाजपाने गोंजारु द्या अथवा मुका घेऊन द्या. आम्ही विचारांची उंची वाढवतो तलवारीला धार काढतो. तर खा.किरीट सोमय्या म्हणतात आता मुंबई महापालिकेतील माफीया राजचा अंत येणार आहे. नामदार सुधीर मुनगंटीवार म्हणतात मंत्री मंडळात “हम साथ साथ असतो मात्र बाहेर गेल्यावर हम आपके है कौन”? असे होतो. अश्या प्रकारची अनेक जाहीर वक्तव्य आपण व भाजप सेनेच्या नेत्यांनी केली आहेत.
जमु काश्मिर येथील पुलवामा या ठिकाणी दि.१४ फेब्रु. २०१९ रोजी वीर जवांनांच्या गाड्यांवर आत्मघाती आंतकवादी हल्ला झाला त्यात वीर भारतीय जवांनांच्या शरीराच्या चिधड्या चिधड्या होऊन ४२ जवानांना वीर मरण आले. सारा देश शोकसागरात बुडालेला असतांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युतीची बोलणी करण्यासाठी मातोश्री वर आले. मिष्टान्न पदार्थांवर ताव मारत युतीची दाळ शिजवली. हे निषेधार्य व धक्कादायक होते. त्यानंतर दि.१८ फेब्रु. २०१९ रोजी आपण भाजपा अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन युतीची घोषणा केली. तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला वेड्यात काढत आहात. अशी आमची भावना झाली आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे सर्वत्र होत आहे. त्यामुळे आमच्या सारख्या सामान्य कार्यकत्यांची विनाकारण गळचेपी होत आहे. सार्वजनिक जीवनात असे लाजीरवाणी आणि कोडगे जिने आम्ही जगू शकत नाही. जिकडे भेळ तिकडे खेळ हे आम्हाला मान्य नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणाबाबत देशभर असंतोष आहे. शेतकरी, कामगार, बेरोजगार युवक, महागाईमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे केंद्रातील हे जुलमी सरकार पदच्युद व्हावे, अशी सर्वांची मनापासून इच्छा आहे. मात्र ऐकमेकाविरुध्द येवढ्या टोकाच्या भूमिका घेतलेल्या असताना पुन्हा गळ्यात गळा घालणे. हे सरळ-सरळ जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रकार आहे. कार्यकते शेळ्या मेंढ्या नसून त्यांनाही इश्वराने बुद्धी दिलेली आहे. त्यामुळेच मी शिवसेना या पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. तो स्वीकारावा हि विनंती, असे पत्रात म्हटले आहे.











