न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (दि. २२ फेब्रु.) :- पिंपळे गुरव येथे बुधवार (दि. २०) रोजी पवना नदी शेजारी भगवान शंकराच्या मंदिराचे बांधकाम सुरु असताना, अचानक मंदिराचा स्लॅब कोसळला. त्याठीकाणी बांधकाम करत असलेले मजूर कोसळलेल्या स्लॅबच्या मलब्याखाली अडकले. या घटनेत हकनाक तीन मजुरांचा बळी गेला व काही गंभीर जखमी झाले आहेत. या बेकायदेशीर व अनधिकृत मंदिर उभारणीस महापालिकेचा बांधकाम विभाग जबाबदार असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनपाचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपळे गुरव येथील महादेव मंदिराचे बांधकाम कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला. सात ते आठ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या मंदिराचे बांधकाम अनधिकृतपणे सुरू होते. हे अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची नोटीस १६ नोव्हेंबर २०१८ रोजी दिली होती. नोटीस बजावून देखील हे बांधकाम सुरूच होते. त्याला पालिकेचा बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग जबाबदार आहे. केवळ राजकीय दबावापोटी या विभागाने मंदिराच्या बांधकामावर कारवाई केली नाही.
मंदिराच्या बांधकामाला केवळ नोटीस बजावून पालिका अधिकारी शांत का बसले? गोरगरिबांचे पत्राशेड देखील नोटीस देऊन पाडले जाते. मग, या बांधकामाला अधिका-यांनी का समर्थन दिले?. याचा खुलासा संबंधित विभागातील अधिका-यांनी करावा. या विभागातील संबंधित अधिका-यांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे साने यांनी या निवेदनात म्हटले आहे.











