न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतून आठ जणांची गच्छंती झालेली आहे. यात भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, विकास डोळस, अपक्ष नगरसेविका साधना मळेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे आणि शिवसेनेचे अमित गावडे यांचा समावेश आहे.
या आठ जणांचा दोन वर्षांचा कार्यकाळ फेब्रुवारीअखेर संपुष्टात आला आहे. मुदत संपल्यामुळे या आठ जणांच्या जागी आज शुक्रवार (दि. २२) रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नवीन नावांची घोषणा करण्यात आली.
आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. त्यांनी नवीन स्थायी समिती सदस्यांच्या नावांची घोषणा केली. यात भाजपकडून राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, शीतल शिंदे, आरती चोंधे तसेच अपक्ष नगरसेविका झामाबाई बारणे यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भालेकर, मयूर कलाटे, आणि शिवसेनेकडून गटनेते राहुल कलाटे या आठ जणांच्या नावाला महापौर राहुल जाधव यांनी महासभेत हिरवा कंदील दाखविला. निवड होणाऱ्या भाजप सदस्यापैकी एकाची सभापतीपदी वर्णी लागणार हे निश्चित.











