न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रु.) :- नगरसेवक मयूर कलाटे यांनी प्रसिधीपत्रक काढले असून, यात त्यांनी म्हटले आहे की, ‘देशात लोकसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यादृष्टीने सर्व पक्षांनी आपआपल्या संभाव्य उमेदवारांना तयारी करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. सर्वच पक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तयारीस लागलेले आहेत.
मावळ लोकसभेमधून पार्थ पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमामधून लोकसभेसाठी तयारी चालू केली होती. त्यादृष्टीने गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी मावळातील वडगाव, तळेगाव, पिंपरी चिंचवड या भागात दौरे काढून, मावळ लोकसभेच्या मतदार संघाची माहिती व नागरीकांची मते जाणून घेतली आहेत. त्यामध्ये पार्थ पवार यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विचारांची ताकत अधिक आहे. आजवर मतांची विभागणी आणि बंडखोरी झाल्याने अपयश आले आहे. भाजप व शिवसेनाला या मतदारसंघात थोपवायचे असेल तर पार्थच योग्य उमेदवार असणार आहेत. पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही. तसेच इतर पक्षांचीही मदत मिळेल.
त्यामुळे आम्ही सर्व पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगरसदस्य पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी अशी मागणी करीत आहोत की, मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यानांच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात यावी. याबाबत लवकरच शरद पवार यांची वेळ घेऊन त्यांच्याकडे पार्थ पवार यांनाच मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी पक्षाच्या वतीने एकमुखी मागणी करणार आहोत’, असे मयुर कलाटे यांनी या पत्रकात म्हटले आहे.











