- कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त श्रमावर पालिका हाकतेय कारभाराचा गाडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील तब्बल ४ हजार ३६८ पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ब वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात आला. त्यामुळे अनेक नवीन पदे निर्माण झाली आहेत. तसेच दर महिन्यास किमान १५ ते २० अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर आणि स्वेच्छा निवृत्ती घेऊन निवृत्त होत आहेत. महापालिका हद्दीतील लोकवस्ती वेगाने वाढत असल्याने लोकसंख्या वाढून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. तब्बल ४ हजार ३६८ इतकी पदे व नव्याने निर्माण झालेली पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारामुळे उघड झाले आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेकांना अतिरिक्त पदभार सोपवून कामे करून घेतली जात आहेत.
पिंपरी महापालिकेचे विविध विभागातील अ, ब, क आणि ड या श्रेणीत एकूण ३५६ संवर्ग आहेत. यात मंजूर पदांची संख्या ११ हजार ५१३ आहे. त्यापैकी ७ हजार १२४ इतकी पदे भरली आहेत. तर ४ हजार ३६८ इतकी पदे रिक्त आहेत. अ श्रेणीत एकूण १२१ संवर्ग आहेत. त्यात २८१ पदे मंजूर असून त्यापैकी १६५ पदे भरलेली असून ११६ पदे रिक्त आहेत. ब श्रेणीत एकूण ४७ संवर्ग आहेत. त्यात ३२४ पदे मंजूर असून त्यापैकी २०७ पदे भरलेली असून ११७ पदे रिक्त आहेत. क श्रेणीत एकूण १५४ संवर्ग आहेत. त्यात ५३५० पदे मंजूर असून त्यापैकी ३३९७ पदे भरलेली असून १९५३ पदे रिक्त आहेत. ड श्रेणीत एकूण २७ संवर्ग आहेत. त्यात २९६५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १७२४ पदे भरलेली असून १२४१ पदे रिक्त आहेत. ड-सफाई संवर्ग श्रेणीत ७ संवर्ग आहेत तर त्यात २५९३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १६५२ पदे भरलेली असून ९४१ पदे रिक्त आहेत. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीतून उघडकीस आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत अत्याधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञान, कंत्राटी पद्धतीने उपलब्ध मनुष्यबळात नियमित कामांचा गाडा ओढला जात आहे. मात्र, पालिकेतील एकूण पदे आणि प्रत्यक्ष मनुष्यबळाची पडताळणी केल्यास रिक्त पदे अधिक आहेत. रिक्त पदांमुळे सेवेत दिरंगाई होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होतो. त्यामुळे प्रशासनाने ही रिक्त पदे तात्काळ भरण्याची आवश्यकता आहे.
महापालिकेच्या गट ब आणि क या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने अर्जही मागविले आहेत. या ३८६ पदांसाठी तब्बल १ लाख ३० हजार अर्ज आले आहेत. यामधील सुमारे ९० हजार जणांनी परिक्षेचे शुल्क भरले आहे. या सर्व पदांची परिक्षा घेण्यास टीसीएस कंपनीला नियुक्त केले. मात्र, मोठ्या संख्येत अर्ज आल्याने परिक्षेचे नियोजन कधी करावे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















