- एनआयपीएम ची स्टुना २०१९ राष्ट्रीय विद्यार्थी परिषद संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २३ फेब्रु.) :- युवा पिढीने संधींचे नवे मार्ग शोधण्याची गरज असून, त्यादृष्टीने स्वतःच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल करावे, असे आवाहन एन.एम.एच.आर सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. आर. नागराज यांनी व्यक्त केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटच्या पुणे विभागाच्यावतीने शिवाजीनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) च्या सभागृहामध्ये शनिवार दिनांक २३ फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित स्टुना २०१९ या राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक जुनी पिढी ही नव्या पिढीला त्यांच्या वर्तणुकीबद्दल कायम दोषच देत राहिलेली आहे. परंतु, ही पिढीदेखील त्यांच्या युवा काळात अशाच दोषांची धनी ठरलेली आहे. मात्र, या नकारात्मक बाजूकडे न पाहता आताच्या नव्या युवा पिढीची बलस्थाने नेमकी काय आहेत? हे सांगत, नव्या पिढीने कशा प्रकारे स्वतःच्या करिअरबद्दल तयारी करायला हवी याबद्दल विविध उदाहरणांसह मार्गदर्शन केले.
युवा पिढीने खरे, तर अशा प्रकारची उल्लेखनीय कामगिरी करून दाखवावी, की जेणेकरून जुन्या पिढीला या कामगिरीचा हेवा वाटून आपण या पिढीत का जन्मलो नाही, असे वाटावे. सध्याच्या युवा पिढीकडे मोठमोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्याची क्षमता आहे, मात्र, ही स्वप्ने वास्तवाचे भान लक्षात ठेवून पाहायला हवीत ही जाणीवही नागराज यांनी करून दिली.

यावर्षी परिषदेचे आयोजन करण्याचा मान एनआयपीएमच्या पुणे विभागाला मिळाला असून, ‘संधींचे नवे राजमार्ग-सहस्त्रकांसाठी वृद्धिचे सोपान’ (न्यू विस्तास ऑफ अपॉरचूनीटीज- ग्रोथ लॅडर फॉर मिलेनियल) ही या परिषदेची मुख्य संकल्पना होती.
यावेळी थरमॅक्स कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष शरद गांगल, एसीसी व नोव्हारटिस कंपनीचे माजी वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक डॉ. नरेंद्र मेहरोत्रा, दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स लि. चे नरेश कुमार, पिनिशेट्टी, एम्क्युअर फार्मास्युटिकलचे मनुष्यबळ व्यवस्थापकीय अध्यक्ष प्रशांत पराशर, ज्येष्ठ व्यवस्थापन सल्लागार कुलदीप जोशी, स्ट्रॅटेजिक बिझनेस भारत फोर्ज लि. चे अध्यक्ष व संचालक कृष्णकुमार श्रीनिवासन यांसारख्या नामवंत व्याख्यात्यांनी तसेच आशावरी रॉय, सोमोजिता दास व पियुष जैन या विद्यार्थ्यानीही व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले.
या परिषदेचे प्रास्तविक करताना एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी म्हणाले की, ”एनआयपीएमचे व्यासपीठ उद्योजगतात नव्याने येऊ पाहणाऱ्या मनुष्यबळ व्यवस्थापकांसाठीही उपलब्ध व्हावे म्हणूनच एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले. तसेच व्याख्याते म्हणून बोलण्याची संधी देण्यात आली”.
या राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेसाठी देशभरातील ५० हुन अधिक व्यवस्थापन संस्था व विद्यापीठांचे विद्यार्थी, प्राध्यापक, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषेदेचे समन्वयक म्हणून डॉ. एस.व्ही. भावे यांनी काम पाहिले, तर परिषदेतील तीन सत्रांचे समन्वयक म्हणून डॉ. कॅप्टन सी.एम. चितळे, हेमांगी धोकटे व समीर कुकडे यांनी काम पाहिले.
याप्रसंगी कार्यक्रमाला एनआयपीएम पुणे विभागाचे अध्यक्ष उमेश जोशी यांच्यासह कार्यकारी समिती सदस्य कल्याण पवार, झाकीर शेख, सदाशिव पाटील, अमृता तेंडुलकर, सुनील नेवे, अजय कुलकर्णी, डॉ. राजेंद्र सबनीस उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुश्री सरकार या विद्यार्थिनीने, तर आभार प्रदर्शन झाकीर शेख यांनी केले.











